मतदार ममतांना घरी बसवणार!
   दिनांक :14-May-2019
पश्चिम बंगालमध्ये अपेक्षेप्रमाणे लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. यात भाजपाच्या एका आणि तृणमूल काँग्रेसच्या एका अशा दोन कार्यकर्त्यांचा बळी गेला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा हिंसाचारात बळी गेल्यामुळे दोन्ही पक्षांना एकदुसर्‍यावर आरोप करण्याची, हिंसाचाराला जबाबदार ठरवण्याची संधी मिळाली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली पातळी सोडली, सर्व मर्यादांचे उल्लंघन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ज्या शब्दांचा आणि भाषेचा वापर ममता बॅनर्जी यांनी केला, तो पाहता ममता बॅनर्जी यांचे डोके तर फिरले नाही ना, असे वाटू लागले. संधी मिळाली तर मोदींचा इंचइंच बदला घेण्याची आणि त्यांना झापड मारण्याची धमकी बॅनर्जी यांनी दिली.
 
दस्युसुंदरी फुलनदेवीनही वापरली नसेल अशी भाषा आणि ती वागली नसेल अशी ममता बॅनर्जी यांची वागणूक राहिली. आपण एका राज्याच्या मुख्यमंत्री आहोत, आणि देशाच्या पंतप्रधानांबद्दल आपण बोलतो आहे, याचे भानही त्मांनी ठेवले नाही. याच ममता बॅनर्जी यांना लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडत आहे. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहण्यात काही गैर नाही, मात्र त्यादृष्टीने वाटचाल करताना आपली वागणूक आणि भाषा अधिक जबाबदारीची ठेवायला हवी होती. पश्चिम बंगालमधील निवडणूक हिंसाचाराची सर्वस्वी जबाबदारी तृणतूल काँग्रेस आणि या पक्षाच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आहे. 

 
 
 
ममता बॅनर्जी बंगालमध्ये दीदी म्हणून ओळखल्या जात असल्या तरी पश्चिम बंगालमधील राजकीय स्थितीचा अभ्यास असलेल्यांना त्या तेथील दादाच वाटतात. राजकारणातील लेडी डॉन म्हणून त्यांचा उल्लेख केला तर तो गैर ठरु नये. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये 34 वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्या पक्षांना पराभूत करून सर्वप्रथम सत्ता मिळवली, तेव्हा त्यांचे देशभर कौतुक झाले. डाव्या पक्षांच्या हिंसाचाराचा आणि गुंडागर्दीचा सामना करणे सोपे नव्हते, तो ममता बॅनर्जी यांनी केला. डाव्या पक्षाच्या गुंडागर्दीला आणि हिंसाचाराला राज्यातील जनता कंटाळली होती, गुंडागर्दी आणि हिंसाचाराच्या मार्गाचा अवलंब करत डावे निवडणुका जिंकत आले होते, त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा उंचावल्या.
 
राज्यातील गुंडागर्दी आणि हिंसाचार त्या आटोक्यात आणतील, असे सर्वसामान्य जनतेला वाटू लागले. पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. काही वर्षातच डावे बरे पण ममता नको, असे म्हणण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली. डावे पक्ष नागनाथ होते, तर ममता बॅनर्जी सापनाथ ठरल्या. ममता बॅनर्जी निर्मतता बॅनर्जी कधी आणि कशा झाल्या ते राज्यातील जनतेला समजलेच नाही. राज्यातील जनतेने दुसर्‍यांदा दिलेल्या सत्तेचा उपयोग ममता बॅनर्जी यांनी लोककल्याणासाठी करायला हवा होता, पण ममता बॅनर्जी यांनी तो गुंडागर्दी आणि भ्रष्टाचारासाठी केला. त्यांच्या दुसर्‍या राजवटीत या दोन्ही गोष्टींना प्रचंड उत आला. कधी डाव्यांना आपला दुश्मन क्रमांक 1 समजल्या जाणार्‍या ममता बॅनर्जी यांनी आता भाजपाला आपला दुश्मन क्रमांक एक बनवून टाकले. राज्यातील आपल्या सत्तेला खरा धोका भाजपापासूनच आहे, याची त्यांना जाणीव झाली.
 
मुख्य म्हणजे ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषेने आणि वागणुकीने आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला. पंचायत निवडणुकांपासून राज्यात सरू असलेला हिंसाचार विधानसभा निवडणुकीच्या मार्गाने लोकसभा निवडणुकीपर्यंत आला. राज्यात आपल्या विरोधकांना प्रचार करता येणार नाही, अशी परिस्थिती ममता बॅनर्जी यांनी निर्माण केली. विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करणे, त्यांच्यावर खोट्या आरोपांखाली गुन्हे दाखल करणे, त्यांना तुरुंगात डांबणे, विरोधी पक्षांच्या प्रचारसभांना परवानगी नाकारणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे हेलिकॉप्टर उतरू न देणे, मतदान केंद्र ताब्यात घेणे, खोटे मतदान घडवणे, असे अनेक प्रकार ममता बॅनर्जी यांनी सरकारी यंत्रणेचा विशेषत: पोलिस खात्याचा दुरुपयोग करून राज्यात केले. भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांच्या बाबतीत ममता बॅनर्जी यांची वागणूक पाहिल्यावर त्या कधीकाळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारमध्ये होत्या, यावर विश्वास बसत नाही. कोलकाताचे माजी पोलिस आयुत राजीवकुमार यांच्यावरील सीबीआय धाडीच्या काळातील ममता बॅनर्जी यांची वागणूक मुख्यमंत्रिपदाला शोभणारी नव्हती.
 
एका भ्रष्ट पोलिस अधिकार्‍यासाठी राज्याचा मुख्यमंत्री धरण्यावर बसतो, हा प्रकार देशात आधी कधी घडला नाही, आणि पुढेही घडण्याची शक्यता नाही. विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांची हत्या करायलाही तृणमूलचे कार्यकर्ते मागपुढेे पाहात नाहीत. राज्यात प्रचंड दहशतीचे वातावरण ममता बॅनर्जी यांनी निर्माण केले. ममता बॅनर्जी यांची वागणूक एका हुकुमशहाला साजेशी आहे. मुख्यमंत्रिपदाच्या दुसर्‍या कार्मकाळात ममता बॅनर्जी यांची सरकारवर पकड राहिली नाही, लोकांमधील असंतोष वाढीस लागला, त्यामुळे आपल्या संभाव्य पराभवाच्या शक्यतेने ममता बॅनर्जी यांचा तोल सुटला. त्यातून विरोधकांवरील विशेषत: भाजपा कार्यकर्त्यांवरील दडपशाहीला सुरुवात झाली.
 
ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे नेते मतदारांवर कसा दबाव आणतात, याचे अनेक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातून पश्चिम बंगालमध्ये कायद्याचे राज्य आहे की नाही याची शंका यावी. राज्यातील पोलिस यंत्रणेचा जेवढा दुरुपयोग ममता बॅनर्जी यांनी केला, तेवढा आतापर्यंत खचितच दुसर्‍या कोणा मुख्यमंत्र्याने केला असेल. राज्यात आपल्या पसंतीचे पोलिस अधिकारी राहावे, यासाठी ममतांनी केलेला आटापिटा सगळ्यांनीच पाहिला आहे. राजकारणात मतभेद असतात, पण मनभेद होऊ द्यायचे नसतात, मुख्य म्हणजे भिन्न विचारसरणीचे लोक आपले राजकीय विरोधक असतात, शत्रू नसतात, याचा विसर ममता बॅनर्जी यांना पडला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना भाजपाचा कार्यकर्ता आणि नेता आपला शत्रू वाटू लागला.
 
मतांसाठी मुस्लिमांचे तुष्टीकरण करताना ममता बॅनर्जी भाजपासोबत राज्यातील हिंदूंनाही आपला शत्रू समजू लागल्या, हे हिंदूंचेे नाही तर त्यांचे दुर्देव आहे. त्यामुळेच नवरात्रात दुर्गादेवींच्या मिरवणुकांना परवानगी नाकारणार्‍या ममता बॅनर्जी यांना इमामांना सरकारी तिजोरीतून पगार देण्यात काही गैर वाटत नाही. ममता बॅनर्जी यांची वागणूक अतिशय साधी आहे, पांढरी सुती साडी आणि हवाई चप्पल त्या वापरतात, पण ममता बॅनर्जी यांची हीच पांढरी साडी निष्पाप आणि निरपराध भाजपा कार्यकर्त्यांच्या रक्ताने बरबटली आहे. त्यावर रक्ताचे शितोंडे उडाले आहे. ममता बॅनर्जी यांची स्थिती आज अशाच नरभक्षक वाघिणीसारखी झाली आहे. लोकशाहीत आपल्याला कोणावर गोळ्‌या घालण्याचा अधिकार मिळत नाही, अगदी ज्याचा लोकशाहीवर विश्वास नाही त्याच्यावरही गोळ्‌या घालता येत नाही, मात्र मतदानाचा आपला अधिकार तर कोणी हिरावून घेऊ शकत नाही.
 
त्यामुळे लोकशाहीवर विश्वास नसणार्‍या आणि आपल्या स्वार्थासाठी हिंसाचार आणि गुंडागर्दी करणार्‍यांना ईव्हीएमच्या माध्यमातून धडा शिकवता येतो. पश्चिम बंगालमधील जनतेने तेच केले आहे. राज्यात भाजपाची ताकद वाढणार आहे, तर ममता बॅनर्जी यांची ताकद कमी होणार आहे. त्यावेळी ममता बॅनर्जी यांची अवस्था मतदार नख काढलेल्या वाघिणीसारखी आहेत, हे निश्चित!