स्वच्छतेसाठी शौचालयाच्या छतावर आमरण उपोषण

    दिनांक :14-May-2019
कारंजा लाड: वाशीम जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या कारंजा शहरात स्वच्छतेसाठी 13 मे पासून कांगारपुरा परिसरात असलेल्या सार्वजनिक पुरूष शौचालयाच्या छतावर सामाजिक कार्यकर्ते छगन वाघमारे यांनी आमरण उपोषणास सुरूवात केली आहे. सदर उपोषणा संदर्भात त्यांनी वाशीम जिल्हा पालकमंत्री जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, न प मुख्याधिकारी व ठाणेदार यांना लेखी निवेदनातून माहिती दिली होती.
 

 
 
दरम्यान कारंजा न प ने वाघमारे यांना पत्र देवून उपोषणास बसू नये , बसल्यास कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे बजावले होते. तर वाघमारे यांनी आपणास पत्र मिळाले नसल्याचे सांगितले. अखेर नप प्रशासनाकडे विरेाधास न जुमानता 13 मे रोजी दुपारी 11 वाजता त्यांनी आमरण उपोषणास सुरूवात केली. कांरजा शहरातील कांगारपुरा भागातील सांडपाण्याच्या नाल्यांची तसेच सार्वजनिक शौचालय व मुत्रीघराची गेल्या कित्येक दिवसांपासून स्वच्छता न करण्यात आल्याने सदर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना आपल्या घरात राहणे कठीण झाले आहे या संदर्भात साफसफाई करण्यासाठी स्थानिक नप प्रशासनाला येथील रहिवाशांनी वेळोवेळी निवेदने दिली. परंतु त्याचा काहीही फायदा न झाल्याने अखेरीस सामाजिक कार्यकर्ते छगन वाघमारे यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. साफसफाईच्या मागणीव्यतिरिक्त स्थानिक नप मधील संबंधित विभागातील खातेप्रमुख व कर्मचारी यांची खातेनिहाय चैकशी करण्याची मागणी देखील वाघमारे यांनी केली आहे.
वाघमारे यांच्या उपोषणाकडे कारंजा वासियांचे लक्ष लागले आहे. उपोषणास सामाजिक संघटना तसेच शहरातील नागरिकांचा वाढता पाठिंबा दिसून आला. सदर उपोषणाचा नप प्रशासनावर काय आणि कसा परीणाम होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान मागण्या मान्य हेाईपर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्धार यावेळी वाघमारे यांनी बोलून दाखविला. तर एकीकडे शासकीय स्तरावरून देश हागणदारी मुक्त करण्याकरीता प्रयत्न केले जात असतांनाच दुसरीकडे कारंजा नप कडुन हागणदारी मुक्त अभियानाला हरताळ फासल्या जात असल्याचा आरेाप देखील वाघमारे यांनी केला.