कोलकाता : अमित शहा यांच्या रैलीला हिंसेचे गालबोट

    दिनांक :14-May-2019
कोलकाता : कोलकात्यात भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शोदरम्यान तुफान राडा झाला. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकात्यातील रोड शो दरम्यान दगडफेक झाली. ही दगडफेक तृणमूल काँग्रसे काँग्रेसकडून करण्यात आली, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषद आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यामुळे काही काळ वातावरण तणावग्रस्त होते. अमित शाह यांना सुरक्षित स्थळी हलवल्यामुळे ते सुखरुप आहेत.
 

 
 
कोलकात्यातील धर्मतल्ला भागातील शहीद मिनार मैदानातून अमित शाह यांच्या रोड शोला सुरुवात झाली. मेडिकल कॉलेजजवळ हा रोड शो आल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी 'गो बॅक'चा नारा दिल्याने भाजप कार्यकर्ते चिथावले. अमित शाह यांच्या ट्रकच्या दिशेने काठ्या फेकण्यात आल्यानंतर या हिंसाचाराला प्रोत्साहन मिळाले. त्यानंतर रस्त्यावर एकच गोंधळ निर्माण झाला. रस्त्यावर एकच पळापळ सुरु असल्याचे चित्र होते. त्याचवेळी रस्त्यावर जाळपोळीच्याही घटना घडल्या. त्यामुळे पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळविणे कठिण झाल्याचे पाहायला मिळाले.