'त्याने' रक्तदानासाठी मोडला रमजानचा रोजा
   दिनांक :14-May-2019
आसाममधील एका मुस्लिम व्यक्तीने पवित्र रमजान महिन्यातील रोजा मोडत, हिंदू महिलेला रक्तदान केल्याने त्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. मुन्ना अन्सारी असे त्याचे नाव असून, तो सोनीतपूरमधील ढेकियाजुलीचा रहिवासी आहे. तो दररोज सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत रोजा पाळतो. मात्र तरी देखील, रक्ताची गरज असल्याच्या एका फोनवर त्याने आपला रोजा मोडत रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले.
 

 
अन्सारीने रोजा मोडत थेट विश्वनाथ रुग्णालय गाठले व या ठिकाणी उपचार घेणा-या रेबती बोरा या ८५ वर्षीय हिंदू महिलेसाठी रक्तदान केले. ही महिला आठवडाभरापासून रुग्णालयात दाखल असून, तिला पित्त मुत्रशयाचे निदान झालेले आहे. तिला तत्काळ बी- निगेटीव्ह गटाच्या रक्ताची आवश्यकता होती. जिल्हा रक्तपेढीत उपलब्ध असलेले रक्त तिच्या रक्तगटाशी जुळत नव्हते, तिचे कुटूंबीय देखील तीन दिवसांपासून तिचा रक्तगट असलेल्या रक्तदात्याचा शोध घेत होते. अखेरीस तीन दिवसानंतर रेबतीच्या मुलाने मानवता स्वयंसेवी रक्तदाता गटाच्या फेसबुक पेजवर रक्ताची नितांत गरज असल्याचा संदेश पाठवला. हे पाहून अन्सारीने माझा रक्तगट बी- निगेटीव्ह असल्याचे त्याला कळवले व रक्तदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी रूग्णाल गाठले.
आईला वेळेत रक्त मिळाल्याने भावनिक झालेल्या अनिलने माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, माझे आणि त्याचे कोणतेही रक्ताचे नाते नव्हते मात्र आता माझ्या आईच्या रक्ताद्वारे आम्ही एक झालो आहोत. हे बोलताना अनिलला अश्रू अनावर होत होते. तो म्हणाला की मुन्नाच्या या कृतीने हे दाखवू दिले आहे की, सर्वच नाती काही रक्ताच्या किंवा धर्माच्या बंधनात बंदिस्त नसतात. मुन्ना अन्सारी हा अनेक वर्षांपासून मानवता स्वयंसेवी रक्तदाता गटाचा नियमीत रक्तदाता आहे. आयुष्यभर रक्तदानाचे कार्य करत राहण्याची त्याची इच्छा आहे.