भारतीय लष्कराचा युनिफॉर्म बदलणार?

    दिनांक :14-May-2019
नवी दिल्ली,
भारतीय लष्कराच्या गणवेशात लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता आहे. यासाठी लष्कराच्या मुख्यालयाने अधिकाऱ्यांकडून सूचना मागवल्या आहेत. लष्करी मुख्यालयाने देशातल्या जवळपास 11 संचलनालयांना यासाठी पत्र पाठवले असल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. लवकरात लवकर तुमच्या सूचना पाठवा, असे मुख्यालयाने पत्रात म्हटले  आहे.
 
 
अनेक देशांच्या लष्कराच्या गणवेशात पँट आणि शर्टचा रंग वेगळा आहे. याच धर्तीवर भारतीय लष्कराच्या गणवेशात बदल केला जाऊ शकतो, अशी सूचना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केली. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशावर एक पट्टी असते. त्यावर लावण्यात आलेल्या स्टार्सवरुन अधिकाऱ्याचे पद कळते. तर अमेरिका आणि ब्रिटनमध्ये छातीवर लावण्यात आलेल्या चिन्हांवरुन अधिकाऱ्यांचे पद समजते. ही बाबदेखील गणवेशात बदल करताना लक्षात घेतली जाणार आहे.
जवानांच्या बेल्टमध्येही बदल करण्याची सूचना काही अधिकाऱ्यांनी दिली आहे. गणवेशात बदल करण्याची चर्चा याआधीही अनेकदा झाल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली. लष्कराच्या गणवेशात अनेकदा लहानसहान बदल झालेले आहेत. आता पुन्हा एकदा गणवेशात बदल करण्यासाठी सूचना मागवण्यात आल्या आहेत. मात्र यासाठी बराच वेळ लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.