हॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री डॉरिस डे यांचे निधन
   दिनांक :14-May-2019
हॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका डॉरिस डे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्या ९७ वर्षांच्या होत्या. डॉरिस डे या अमेरिकेतील सर्वात मोठ्या बॉक्स ऑफिस स्टार होत्या. हॉलिवूडमध्ये ‘द गर्ल नेक्स्ट डोअर’ या नावाने त्या प्रसिद्ध होत्या. केवळ अभिनयच नाही तर प्राण्यांच्या सेवेसाठीदेखील त्यांनी योगदान दिले होते. प्राण्यांच्या सेवेसाठी त्यांनी वयाच्या ५० व्या वर्षी हॉलिवूडला रामराम ठोकला. त्यांचं अॅनिमल फाऊंडेशन असून त्या पशु कल्याण कार्यकर्त्यादेखील होत्या.
 
 
 
कॅलिफोर्नियातील कार्मेल व्हॅलीत राहत्या घरी डे यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे डॉरिस डे अॅनिमल फाउंडेशनने कळवले  आहे. एप्रिल १९२२ मध्ये डे यांचा जन्म झाला होता. त्यांच्या पूर्वाश्रमीचं नाव मेरी अॅन व्होन कॅपलहॉफ असं होतं. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांना नृत्यांगना व्हायचे होते. मात्र एका अपघातामध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि त्यांचे हे स्वप्न भंगले.
 
 
डे यांना २००८ मध्ये लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कलामिटी जेन, पिलो टॉक, क्यू सेरा सेरा हे डे यांचे गाजलेले चित्रपट आहेत.