नागपुरातील एम्प्रेस मॉलवर अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई

    दिनांक :14-May-2019
 नागपूर: कोट्यवधी रुपयांचा बँक कर्ज घोटाळा तसेच आर्थिक फसवणूक प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने मूळ कोलकाता येथील व्यावसायिक तायल समूहाच्या 483 कोटी रुपयांच्या नागपूर येथील एम्प्रेस मॉलवर जप्ती कारवाई करून, वसुली कारवाई आरंभिली असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली
याच समूहाची 234 कोटींची मालमत्ता यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली असून, या प्रकरणात आजवर एकूण 717 कोटींची मालमत्ता जप्त केल्याचेही चौकशी अधिकार्‍यांनी सांगितले. बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यान्वये तायल समूहाची संपत्ती जप्त करण्याचे आदेश अंमलबजावणी संचालनालयाने जारी केले आहेत.
 
 
 
 
तायल कंपनी समूहाने 2008 मध्ये बँक ऑफ इंडिया आणि आंध्र बँकेकडून 524 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन या रकमेची बेनामी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत तायल समूहाविरोधात दाखल करण्यात आलेले हे दुसरे प्रकरण आहे. कंपनीने 2016 मध्ये युको बँकेकडून 234 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन केलेल्या फसवणूक प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय करीत आहे. युको बँकेच्या कर्ज प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने कोलकात्यातील बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक विशेष न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले आहे. फसवणूक केलेल्या रकमेपैकी बहुतांश रक्कम जप्त केलेल्या संपत्तीच्या माध्यमातून वसूल करण्यात आली असून, आता या प्रकरणी न्यायालयीन छाननी केली जात आहे. या प्रकरणात बँक अधिकार्‍यांच्या भूमिकेची चौकशी दुसर्‍या एका खटल्यात केली जात असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.
कंपनीचे प्रवर्तक प्रवीण कुमार तायल यांच्या नेतृत्वातील तायल समूहाने देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले आहे. एका विशिष्ट कारणासाठी बँकांनी दिलेल्या कर्जाचा वापर बेनामी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कंपनी समूहाने केल्याचेही तपासात निष्पन्न झाले असून, यात कर्ज देणार्‍या बँक अधिकार्‍यांच्या भूमिकेविषयी देखील निराळ्या पद्धतीने चौकशी करण्यात येत आहे.