विद्यार्थ्यांना प्रवासभत्त्यापोटी मिळणार 6 हजार

    दिनांक :14-May-2019
भंडारा: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली शासनस्तरावरून सुरू झाल्या आहेत. शाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या दुसर्‍या शाळेत केल्यास 1 किमीपेक्षा जास्त अंतरासाठी प्रती विद्यार्थ्याला प्रवासभत्त्यापोटी 6 हजार रुपये दिले जाणार आहेत.
शासनाने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन करून त्या बंद करण्याचा मानस बाळगला आहे. गेल्या वर्षी राज्यात 1300 शाळा बंद करण्यात आल्या होत्या. यंदा हा आकडा 5 हजारांच्या जवळपास असलेल्याचे बोलले जात आहे.
 
 
 
जिपच्या 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत 2 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकाच्या वेतनावर होणारा खर्च, सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत शाळेवर होणार खर्च लक्षात घेता, शासनावर कोट्यवधींचा बोझा पडतो आहे. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करून या शाळा बंद करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
शिक्षण सचिवांनी यासंदर्भात एक बैठक घेऊन 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचा आढावा घेतला. कमी पटसंख्या असलेल्या 5 हजार शाळा बंद करण्याचे टार्गेट ठेवले आहे. कमी पटसंख्येच्या शाळांना बंद करण्याचे दुसरेही कारण आहे. या शाळांमधील विद्यार्थी अप्रगत असल्याचे निदर्शनास आले आहे. या शाळांमध्ये शिक्षकांची शिकविण्याची तसेच विद्यार्थ्यांची शिकण्याची मानसिकता ढासळलेली असल्याचा निष्कर्ष आहे.
कमी पटसंख्येच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शाळेत दाखल करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. घरापासून शाळा जर 1 किलोमीटरच्या वर असेल तर विद्यार्थ्यांना प्रवासभत्ता सुद्धा दिला जाणार आहे. गेल्यावर्षी विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी 3 हजार रुपये प्रवास भत्ता देण्यात आला होता. आता प्रवासभत्त्याची रक्कम 6 हजार करण्यात आली आहे.