मी छोट्या लोकांच्या आव्हानांकडे लक्ष देत नाही
   दिनांक :14-May-2019
 
शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
 
 सातारा: दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत ‘जाणता राजा’ किंवा त्यांच्या ‘पंटर’ने चर्चेला यावे, असे खुले आव्हान राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना दिले होते. पाटील यांच्या या विधानाचा शरद पवारांनी आज सोमवारी समाचार घेतला.
 
 
 
 
शरद पवार म्हणाले की, मी छोट्या लोकांच्या आव्हानांकडे लक्ष देत नाही. मुंबईत बसून व्याख्यान देण्यापेक्षा त्या लोकांनी इथे येऊन दुष्काळाची पाहणी करावी.
शरद पवार सध्या दुष्काळ दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यादरम्यान आज त्यांनी सातार्‍यात दुष्काळाच्या परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवरही टीका केली.
शरद पवार म्हणाले की, तिथे मुंबईत बसून व्याख्याने आणि आव्हाने देत बसण्यापेक्षा राज्यभरातील दुष्काळाची पाहणी करावी. तेव्हाच तुम्हाला दुष्काळाची परिस्थिती समजेल. मी दुष्काळाची परिस्थिती पाहण्यासाठी जिथे-जिथे फिरलो आहे, तिथले लोक मला सांगत आहेत की, गावांमध्ये पिण्यासाठी देखील पाणी नाही. पाणी खूप दिवसांनी येते. चारा छावण्यांमध्येही खूप कडक नियम आहेत. रोजगार हमी योजनेत लोकांना कामे मिळत नाहीत.
पवार म्हणाले की, या दौर्‍यादरम्यान मी लोकांचे म्हणणे ऐकून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला वेळ मागणार आहे. दुष्काळाच्या परिस्थितीचा मी घेतलेला आढावा त्यांच्यासमोर मांडणार आहे. त्यांनी या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना कराव्या, यासाठी त्यांची भेट घेणार आहे. शरद पवारांनी यावेळी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. पवार म्हणाले की, मी बातमी वाचली की, मुख्यमंत्री दूरध्वनीवरून दुष्काळाचा आढावा घेत आहेत. हे सगळे ठीक आहे. दूरध्वनीवरून कोणीही माहिती घेऊ शकतो, पण राज्यकर्त्यांनी राज्यभर फिरायला हवे. लोकांमध्ये जायला हवे, तेव्हाच त्यांना इथली परिस्थिती समजेल.