भारत-ऑस्ट्रेलिया ‘अ’ लढत बरोबरीत

    दिनांक :14-May-2019
- हरमनप्रीत सिंगचा महत्त्वपूर्ण गोल
 
सिडनी, 
 
ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंगने अखेरच्या क्षणाला नोंदविलेल्या गोलच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धचा सामना 1-1 गोलने बरोबरीत राखला.
 
 
 
पहिल्या चरणाच्या प्रारंभी भारताने दोन उत्तम बचाव केला, तर त्यानंतर एका पाठोपाठ पेनॉल्टी कॉर्नर रोखण्याची उत्कृष्ट कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया अ संघाच्या आक‘मणाला चोख प्रत्युत्तर देत भारताने सामन्याची निराशाजनक सुरुवात केली. सुरुवातीपासून यजमान संघाने भारतीय संघावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला, परंतु मजबूत संरक्षण फळीने त्यांचे मनसुबे उधळून लावले. मात्र सामन्याच्या 21 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाच्या किरण अरुणसालमने संरक्षण फळी भेदत गोल नोंदविला. त्यामुळे भारत एका गोलने पिछाडीवर पडला. दरम्यान, भारत तीन पेनॉल्टी कॉर्नरला गोलमध्ये परावर्तित करण्यात अपयशी ठरला, तर ऑस्ट्रेलिया अ संघ आपल्या आघाडीत भर पाडण्याच्या प्रयत्नात होता. सामन्याच्या 56 व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने दुसर्‍या प्रयत्नात अचूक टायिंमग साधत जबरदस्त ड्रॅगफ्लिक करून भारताला सामन्यात 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली.
 
सामन्यातील पहिल्या दहा मिनिटात भारतीय संघाने खराब प्रदर्शन केले. प्रतिस्पर्धी संघानेच वर्चस्व गाजविले. दुसर्‍या, तिसर्‍या व चौथ्या चरणातही भारतीय संघ मंदगतीने बॅकफुटवर आला. मात्र यादरम्यान भारताने गोल नोंदविण्याच्या पुरेशा संधी निर्माण केल्या होत्या, असे संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रिड यांनी सांगितले.
 
भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय हॉकी संघाविरुद्ध सामना होणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध आम्हाला दमदार सुरुवात करण्याची गरज राहील. चारही चरणात भारताने वर्चस्व गाजवायला हवे. त्याकरिता आम्ही उद्याच्या सराव सामन्यादरम्यान व्यूहरचना आखणार आहो, असे ते म्हणाले.