मेरी कोमचे 51 किग्रॅ वजनगटात पदार्पण

    दिनांक :14-May-2019
नवी दिल्ली, 
लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सर मेरी कोम आता 51 किग्रॅ या नवीन वजनगटात पदार्पण करणार असून येत्या 20 ते 24 मेदरम्यान गुवाहाटी येथे होणार्‍या इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत ती या नवीन वजनगटात खेळणार आहे. पूर्वी ती 46 व 48 किग्रॅ वजनगटात खेळायची.
 

 
 
ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या पृष्ठभूमीवर इंडिया ओपन स्पर्धेत विजेतेपदासाठी भारताकडून 35 पुरुष व 37 महिला बॉक्सर्स झुंजणार आहेत. या स्पर्धेत 16 बॉक्सिंग पॉवरहाऊसेसमधून जवळपास 200 बॉक्सर्स सहभागी होणार आहे.
 
आशियाई स्पर्धेत 81 किग्रॅ वजनगटात सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर पूजा राणी पुन्हा आपल्या मूळ 75 किग्रॅ वजनगटात परतली आहे. आसामच्या भाग्यवती कचारीनेसुद्धा आपले वजनगट बदलविले आहे. मनीषा मौन प्रथमच 57 किग्रॅ वजनगटात खेळणार आहे. सिमरनजीत कौर व सरितादेवी 60 किग्रॅ वजनगटात खेळणार आहेत.
 
विश्व बॉक्सिंग स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी मेरी कोम गत महिन्यात आशियाई स्पर्धेत सहभागी झाली नव्हती. आता ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ती या स्पर्धेत सहभागी होत आहे.
 
नवीन 51 किग्रॅ वजनगटासाठी माझी उत्तम तयारी झाली आहे. या स्पर्धेत माझा सर्वोत्तम खेळ करण्यास सज्ज असून विश्व स्पर्धेच्या दृष्टीने मी स्वतःची परीक्षा घेऊ इच्छित आहे, असे मेरी कोम म्हणाला. यावेळी आसाममध्ये ही स्पर्धा होत असल्याचा आनंद वाटत आहे. आमचा खेळ बघून युवकांनाही प्रेरणा मिळेल, असे ती म्हणाली.