जोकोविच तिसर्‍यांदा माद्रिद ओपन अजिंक्य

    दिनांक :14-May-2019
तभा ऑनलाईन टीम  
माद्रिद, 
नोवाक जोकोविचने राफेल नदालप्रमाणे 33 वेळा मास्टर्स विजेतेपद पटकावण्याची किमया केली. जोकोविचने स्टीफनोस तित्सिपासवर 6-3, 6-4 असा विजय नोंदवून तिसर्‍यांदा माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
 
 
 
ग्रीसच्या तित्सिपासने उपांत्य लढतीत पाचवेळल्या विजेत्या राफेल नदालला पराभवाचा धक्का दिल्यानंतर प्रथम विश्वमानांकित नोवाक जोकोविचने 24 तासाच्या आतच 20 वर्षीय तित्सिपासवर वर्चस्व गाजवून विजेतेपदावर आपले नाव कोरले. त्याने अवघ्या 90 मिनिटात हा सामना जिंकला . यापूर्वी गत उन्हाळ्यात कॅनडामधील स्पर्धेत तित्सिपासने जोकोविचला हरविले होते.
  
आता पुढील आठवड्यात जोकोविच आणि नदाल आपले 34 वे मास्टर्स विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत. रोलॅण्ड गॅरोस स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून हे दोघेही 26 मेपासून रोम टेनिस स्पर्धेत सहभागी होणार आहेत. हा विजय माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, विशेषतः माझ्या आत्मविश्वासासाठी, असे 15 वेळचा ग्रॅण्ड स्लॅम विजेता जोकोविच म्हणाला. ऑस्ट्रेलियन ओपन जिंककल्यापासून मी आपल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले नाही, परंतु या आठवड्यात चांगली सुरुवात झाली. संपूर्ण सामन्यात मी एकही सेट गमावला नाही. स्पर्धेत एकूणच मी चांगला खेळलो, असेही तो म्हणाला.
 
मी काहीसा थकलो होतो. माझे मन, शरीर काम करत नव्हते. याक्षणी मी कुठलाही विचार करू शकत नाही, मात्र मी माझ्या प्रदर्शनावर खूश आहो. असे तित्सिपास म्हणाला. जोकोविचच विजयाचा हकदार होता. त्याने अविश्वसनीय खेळाचे प्रदर्शन केले. मी त्याचा प्रतिकार करू शकलो नाही, असेही तो म्हणाला.