लवकरच येणार 'या' चित्रपटाचा सीक्वेल
   दिनांक :14-May-2019
बॉलिवूडमध्ये सध्या रिमेक जोरात आहे . १९७८ च्या ‘पती पत्नी और वो’ आणि १९७५ च्या ‘चुपके चुपके’ या चित्रपटांचे  सीक्वेल निर्मिती चालू असतांना निर्माता भूषण कुमार आता २००७ सालच्या ‘भुलभुलैय्या’ या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वेल करणार असल्याचे समोर आले आहे.
 
 
‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘भूषणला भुलभुलैय्याचा सीक्वेल करायचाच होता. फरहाद सामजी हा सीक्वेल लिहिणार असून तोच दिग्दर्शित सुद्धा करणार आहेत. चित्रपटाचे लिखाण चालू असून कथा पूर्ण झाल्यानंतर चित्रपटात नक्की कोण काम करणार आहे हे नक्की करण्यात येईल. चित्रपटात पूर्ण नवीन व्यक्तिरेखा दिसतील.’
भूषण कुमार यांच्या ‘टी सीरिज’ या निर्मिती संस्थेने ‘भुलभुलैय्या २’ हे नाव नोंदवल्यानंतर ही बातमी समोर आली आहे. प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेला भुलभुलैय्या हा मुळात २००५चा तमिळ चित्रपट ‘चंद्रमुखी’चा रिमेक आहे. चंद्रमुखी हा चित्रपटदेखील १९९३ च्या ‘मणीचित्रथाझु’ या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. अक्षय कुमार, विद्या बालन आणि शाइनी अहुजा यांच्या अभिनयामुळे आणि चित्रपटातील गाण्यांमुळे भुलभुलैय्या सुपरहिट ठरला होता.