अखेर घसरण थांबली, निर्देशांकाची २२८ अंकांची कमाई

    दिनांक :14-May-2019
 मुंबई: गेल्या नऊ दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीला आज मंगळवारी अखेर विराम मिळाला आहे. फार्मा, बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सला चांगला भाव मिळाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराने 228 अंकांची कमाई केली.
 
 
 
शेअर बाजाराला सावरण्यात रिलायन्स उद्योग, आयटीसी आणि स्टेट बँकेने महत्त्वाची भूमिका पार पाडली. आज सकाळची सुरुवात किंचित कमाईने झाली. त्यानंतर दुपारपर्यंतच्या व्यवहारात चांगल्या कमाईमुळे निर्देशांक 37,572.70 अशा उंचीपर्यंत पोहोचला होता. मात्र, गुंतवणूकदारांनी पुन्हा नफा कमावण्यावर भर दिल्याने बाजारात काही प्रमाणात घसरणही झाली. दिवसभराच्या उलाढालीनंतर निर्देशांक 227.71 अंकांच्या कमाईसह 37,318.53 या स्तरावर बंद झाला. मागील नऊ दिवसांमध्ये मुंबई शेअर बाजाराने 1940.73 अंक गमावले आहेत.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 73.85 अंकांची कमाई केली. या बाजारातही कमाई आणि घसरणीचे चित्र पाहायला मिळाले. दिवसभराच्या घडामोडीनंतर निफ्टी 11,222.05 या स्तरावर बंद झाला.