टिकटॉक व्हिडीओ बनवणं तरुणाच्या अंगलट

    दिनांक :14-May-2019
टिकटॉकमध्ये ‘वाढीव दिसताय राव’... या लावणीवर हातामध्ये कोयत्यासारखे हत्यार घेऊन चित्रीकरण करणे एका गुन्हेगाराच्या चांगलेच अंगलट आले आहे. वाकड पोलिसांनी ‘त्या’ वाढीव असणार्‍या गुन्हेगारावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
 
 
 
दीपक आबा दाखले (वय २३, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपी दीपकने परिसरात दहशत पसरविण्यासाठी ‘टिकटॉक’चा वापर करून एक व्हिडीओ तयार केला होता.
या व्हिडीओमध्ये ‘वाढीव दिसताय राव’ या लावणीवर हातामध्ये कोयत्यासारखे हत्यार घेऊन एका घरातून बाहेर येताना चित्रीकरण करण्यात आले आहे. हा ‘व्हिडीओ सोशल मीडिया’वर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला.
वाकड पोलिसांच्या तपास पथकातील हरीष माने यांच्या हाती हा ‘व्हिडीओ’ लागला. त्यांनी तात्काळ दाखले याला अटक करून आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकातील कर्मचार्‍यांनी राहत्या घराजवळ सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून व्हडिओमध्ये वापरण्यात आलेले हत्यार देखील जप्त करण्यात आले आहे.