मातीचे नमुना परीक्षण

    दिनांक :15-May-2019
तभा ऑनलाईन टीम,  
मातीचा नमुना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी म्हणजे सेंद्रीय, रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी घ्यावा. मातीचा रंग, जमिनीचा खडकाळपणा, उंच-सखलपणा, पिकातील फरक व बागायत किंवा जिरायत स्थिती लक्षात घेऊन त्याचप्रमाणे शेतीचे वेगवेगळे भाग पाडावेत व त्या प्रत्येक भागाला विशिष्ट क्रमांक द्यावेत. फारच लहान भाग पाडू नयेत. गुरे बसण्याची व झाडाखालची, खते व कचरा टाकण्याची, दलदल व घराजवळची, पाण्याच्या पाटाखालील बांधजवळची, झाडाझुडपे असणारी जागा मातीचे नमुने घेण्यासाठी निवडू नये..

 
 
नमुने कशे घ्यावेत 
सर्वात अगोदर वरील माहिती ध्यानात धरून नमुने घेण्याची जागा निश्चित कराव्यात. सदरच्या ठिकाणी इंग्रजीच्या ‘व्ही’ अक्षराच्या आकृती प्रमाणे ३० सेंटीमीटर खोल खड्डा घ्यावा व त्या खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. मातीचा नमुना चाचणीसाठी खड्ड्याच्या कडेची माती काढावी. अशा प्रकारे सर्व खड्डातून माती जमाकरून गोळा केलेल्या सर्व मातीचा ढीग करून त्याचे ४ समान भाग करावे. समोरासमोरील दोन भागाची माती काढून टाकावी व उर्वरीत मातीचा पुन्हा ढीग करावा व त्याचे पुन्हा ४ समान भाग करून समोरासमोरील दोन भागाची माती काढून टाकावी. ही कृती माती अर्धा किलो शिल्लक असेपर्यंत करावी. वरील माती ओली असल्यास ती सावलीत वाळवावी. ही अर्धा किलो माती प्लास्टिक पिशवीत भरावी आणि खालील माहिती एका कागदावर लिहून तो कागद पिशवीत टाकावा -
 1. नमुना क्रमांक
 2. नमुना घेतल्याची तारीख
 3. शेतकर्‍याचे संपूर्ण नाव
 4. गाव आणि पोस्ट
 5. तालुका
 6. जिल्हा
 7. सर्व्हे किंवा गट क्रमांक
 8. नमुन्याचे प्रातिनिधीक क्षेत्र
 9. बागायत किंवा जिरायत
 10. मागील हंगामातील पिक आणि वाणाची जात
 11. पुढील हंगामातील पिक आणि वाणाची जात
 12. मातीची खोली (सेंटीमीटर मध्ये)
 13. जमिनीचा उतार किंवा सपाट
 14. जमिनीचे काही विशेष लक्षणे-खारवट, चोपण, आम्ल व इतर
 15. पाण्याचा निचरा बरा किंवा वाईट
 16. माती नमुना गोळा करणार्‍याची सही.