टरबूज शेतीतून स्वयंरोजगाराचा संदेश

    दिनांक :15-May-2019
रवी नवलाखे 
मेळघाट म्हणजे समस्यांचा घाट, त्यात भर म्हणजे कुपोषण आणि बालमृत्यू, मातामृत्यू! कुपोषणावर नियंत्रण किंवा उपाययोजनांसाठी मेळघाटात ठाण मांडून बसलेले पद्मश्री डॉ. रवी व स्मिता कोल्हे केव्हा बागायतदार झाले हे त्यांनापण कळले नाही. सध्या कोल्हे परिवार पर्यटक, प्रवासी आणि आदिवासींच्या जिभेवर राज्य करत आहेत. ते फक्त नवनवीन प्रजातीच्या खरबूज आणि टरबुजांचे उत्पादन व विक्रीतून! फळांची शेती आणि विक्रीचे नवीन तंत्र विकसित करणारे कोल्हे कुटुंब आब्यांच्या झाडाखाली बसून मुस्कान, मृदुला, कुंदन, बॉबी आणि मन्नत विकत आहेत. 
 
 
मेळघाटात आदिवासींचे मुख्य व्यवसाय म्हणजे शेती व तीही धान्याची! सरासरी उत्पादनपण कमी तर निसर्गाचा प्रकोप जास्त अशा अवस्थेत सापडलेल्या आदिवासी शेतकर्‍यांना शेतीत नवनवे प्रयोग करून आधुनिक किंवा लाभकारी शेती शिकवणारे डॉ. रवी, स्मिता व रोहित कोल्हे यांनी धारणी जवळच्या कोलुपूर येथील शेतात हळद, कांद्याची शेती, नवीन हरभरा तथा उसाची लागवड करून शेतकर्‍यांसमोर एक उदाहरण प्रस्तुत केल्यानंतर आता फळशेतीकडे त्यांनी मोर्चा वळविलेला आहे.
 
खरबूज व टरबूजच्या नवनवीन प्रजातीच्या बियाणांचे पथदर्शी प्रकल्प राबवून स्थानिक शेतकर्‍यांना लाभकारी शेतीचा नवा मंत्र या दाम्पत्याने दिलेला आहे. राष्ट्रपदी रामनाथ कोिंवद यांचे हस्ते या वर्षाचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त करणारे डॉ. रवी व स्मिता कोल्हे यांना फळशेतीत मदत केली, ती पंजाबराव कृषी विद्यापीठाने, पुत्र रोहित व सून पुजा कोल्हे यांनी!
 
आपला माल आपण विकल्यावर कशा प्रकारे दुप्पट भाव मिळतो, हेपण कोल्हे कुंटुबाने सिद्ध केलेले आहे. चांदपूर आजचे बदललेले नाव कोलुपूर येथे धारणी, परतवाडा मार्गावर आंब्याच्या झाडाखाली बसून ‘खरबूज कॅफे’ लावून फळे विकण्याचे नवे तंत्रसुद्धा शेतकर्‍यांसमोर ठेवण्यात येत आहे. एकरी २ लाख रुपयांचे उत्पन्न घेणारे कोल्हे दाम्पत्य पूर्ण कुटुंबासह दिवसभर ४७ डिग्रीच्या तापमानात दुकान लावून बसत आहेत.
 

 
 
वेगवेगळे वाण
यावर्षी नवीन वाण म्हणून मुस्कान नावाचा सर्वात जास्त गोड खरबूज आलेला आहे. या शिवाय बॉबी, कोहेनूर, मृदुला, मधुरिमा, कुंदन व कस्तुरीसुद्धा बेमिसाल आहेत. 20 रुपये किलो पासून 40 रुपये किलोपर्यंत खरबूजला भाव मिळत आहे. टरबुजाने तर क्रांती केलेली आहे. विशाल नावाचा टरबूज बाहेरून पिवळा दिसतो मात्र, आतून लालगर्द निघतो. दुसरा टरबूज म्हणजे अनमोल आहे, तो बाह्य स्वरूपात हिरवा तर आतला भाग पिवळा असतो. पहिल्या नजरेत अनमोल कच्चा दिसतो. मात्र खाल्ल्यावर त्याचा गोडवा भन्नाट करून सोडतो. मन्नत नावाचे फळ तर कडक असते, मात्र गोडीला त्याच्या तोड नाही. मन्नत म्हणजे उन्हाळ्याची जन्नत आहे.
 
पद्मश्री रवी कोल्हे व स्मिता कोल्हेच्या प्रयत्नाने टरबुजाची शेती सन्मानाची शेती म्हणून प्रसिद्धीस येत आहे. वाढत्या तापमानात लहान- मोठ्यांनी पाणीदार फळे खाल्ल्यास उन्ह लागत नाही. शरीरातील तापमान कमी होऊन रसाळ गोमटी फळे अन्नाची ऊर्जा प्रदान करतात. कॉलेजचे अनेक विद्यार्थी हमखास कोलुपूरला भेट देतात. आपणपण एकदा तरी कोलुपूरला भेट द्यावी.
•