मोस्ट वाँटेड अब्दुल मक्कीला पाकिस्तानमध्ये अटक

    दिनांक :15-May-2019
दहशतवादी संघटना जमात-उल-दावाचा प्रमुख आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील मोस्ट वाँटेड अब्दुल रेहमान मक्की याला पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गुजरांवालामधून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने जमात-उल-दावा, फलाह-ए-इंसानियत फाउंडेशन आणि जैश-ए-मोहम्मदशी निगडीत ११ दहशतवादी संघटनांवर बंदी घातली होती. त्यानंतर पाकिस्तानने ही कारवाई केली. पाकिस्तानाच्या जिओ टिव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.
 
 
 
मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मक्की मोस्ट वाँटेड होता. या हल्ल्यात तब्बल १६६ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. मक्कीवर भडकाऊ भाषण आणि सरकारच्या एफएटीएफच्या गाईडलाईन्सवर टीका करण्याचा आरोप आहे. तसेच मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर अॅक्टनुसार त्याला अटक करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. यापूर्वी मक्कीने व्हिडिओ जारी केला होता. त्यामध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देत काश्मीरला स्वातंत्र्य देण्याची गरळ ओकली होती. तसेच २०१० मध्येही भारतविरोधी वक्तव्यांवरून मक्की चर्चेत राहिला होता. त्याने पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांपूर्वी मुझफ्फराबादमध्ये एक भाषण दिले होते. तसेच पुण्यासहित भारतातील तीन प्रमुख शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचे धमकीही दिली होती. त्यानंतर भारताच्या मागणीवरून अमेरिकेने मक्कीला दहशतवादी घोषित केले होते.