एअर इंडियाच्या वैमानिकावर लैंगिक शोषणाचे आरोप, चौकशीचे आदेश

    दिनांक :15-May-2019
एअर इंडियाने एका वरिष्ठ वैमानिकाविरोधात लैंगिक शोषणप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधीत महिला वैमानिकाने यासंदर्भात तक्रार दिल्यानंतर या घटनेची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
 
एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. महिला वैमानिकाने लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करत एअर इंडिया प्रशासनास दिलेल्या तक्ररीत म्हटले आहे की, आरोपीकडून तिला अयोग्य प्रश्न विचारण्यात आले होते. ५ मे रोजी हैदराबाद येथे प्रशिक्षण शिबिरावेळी ही घटना घडली असल्याचे महिला वैमानिकाने सांगितले आहे.
 
 
येथील एका रेस्टॉरंटमध्ये रात्री ८ वाजता आम्ही जेवणासाठी गेल्यानंतर वरिष्ठ वैमानिकाने मला त्याच्या जीवनात होत असलेल्या त्रासाबद्दल सांगितले. वैवाहिक जीवनात त्याला येत असलेल्या अडचणी सांगितल्या तसेच माझ्यासोबत अश्लिल संवाद केले. त्यामुळे मी त्यांना तेथे थांबण्यास नकार देत कॅब बोलवून घरी जाण्यासाठी निघाल्याचे महिला वैमानिकाने सांगितले. तसेच, वरिष्ठ वैमानिकाच्या या वर्तनामुळे मला धक्का बसला आणि मला अत्यंत अस्वस्थ, भयभीत आणि अपमानित झाल्यासारखे वाटले. त्यामुळे एअरलाइनकडे या प्रकरणाची तक्रार करणे मला नैतिकदृष्ट्या बंधनकारक वाटले, जेणेकरुन अशा वर्तनाची भविष्यात इतर कोणाशीही पुनरावृत्ती होणार नाही .असे देखील महिला वैमानिकाने म्हटले आहे.