‘मी तंबाखूचा प्रचार करत नाही’
   दिनांक :15-May-2019
अभिनेता अजय देवगणने त्याच्या आता पर्यंतच्या कारकिर्दीत अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. त्यातील एक जाहिरात चर्चेचा विषय ठरली आहे. या जाहिरातीतून अजय तंबाखूचा प्रचार करत असल्याची टीका होत आहे. या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी अजयने मौन सोडण्यासाठी ‘मी तंबाखूचा प्रचार करत नाही’ असे प्रत्युत्तर दिले आहे.
 
 
 
अजय कर्करोगाने पिडित असलेल्या चाहत्याच्या संपर्कात असल्याचा खुलासा त्याने केला आहे. तसेच त्याने या जाहिरातीच्या करारामध्ये तंबाखूचा प्रचार करणार नसल्याचे देखील म्हटले आहे. ‘मी माझ्या करारामध्ये नेहमी म्हटले आहे की मी तंबाखूचा प्रचार करणार नाही. मी प्रचार करतो ती वेलचीची. माझ्या करारात असे म्हटले गेले आहे की या पदार्थामध्ये तंबाखू नाही. जर हीच कंपनी दुसऱ्या पदार्थांची विक्री करत असले तर त्या बद्दल मला माहिती नाही’ असा खुलासा अजय देवगणने केला आहे.
राजस्थानमध्ये राहणाऱ्या नानकराम या कर्करोगग्रस्त व्यक्तीने “समाजाच्या कल्याणासाठी तंबाखू उत्पादनाची जाहिरात करु नका”, असे आवाहन अजयला केले होते. त्यासोबतच अजय देवगणला संबोधित करत जयपूरच्या सांगानेर, जगतपुरा आणि इतर जवळपासच्या परिसरामध्ये एक हजार पत्रक वाटले आणि भितींवर लावले होते. यामध्ये तंबाखूचे सेवन केल्याने त्याचे परिणाम आणि त्याच्यामुळे कुटुंबावर ओढावलेली स्थिती याबाबतची माहिती देण्यात आली होती. पत्रकात त्याने मद्य, सिगारेट आणि तंबाखू-गुटखा यांसारख्या अंमली पदार्थांच्या जाहिराती करणे चुकीचे आहे असे देखील म्हटले होते.