नाशिकमध्ये राष्ट्रीय रोइंगपटूवर प्राणघातक हल्ला

    दिनांक :15-May-2019
नाशिक,
 
राष्ट्रीय रोईंगपटू निखिल सोनवणे याच्यावर चोरट्यांनी लूटमार करण्यासाठी प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात निखिल जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकमधील रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व घटनेमुळे निखिलला दोन दिवसांनी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेला मुकावं लागणार आहे.
 
 
 
निखिल मंगळवारी रात्री सराव करुन येत असताना चोपडा लॉन्स येथील पेट्रोल पंपासमोर त्याला चोरट्यांनी रोखले. निखिलला लुटण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी निखिलला अडवले, मात्र त्याच्याकडे काहीच न मिळाल्याने त्यांची निराशा झाली. निखिलकडे काहीच न मिळाल्याच्या रागातून चोरट्यांनी निखिलवर कोयता आणि चाकून हल्ला केला.
 
पुणे येथील नाशिक फाट्याजवळ असलेल्या आर्मी बोटिंग क्लब येथे 17 ते 19 दरम्यान राज्यस्तरी रोईंग स्पर्धा आहे. या स्पर्धेची निखिल तयारी करत होता. मात्र या हल्ल्यामुळे निखिलला या स्पर्धेला मुकावं लागणार असल्याने त्याचं एका वर्षाचं नुकसान होणार आहे. निखिलने याआधी या स्पर्धेत एक सुवर्णपदक आणि एक रौप्यपदक पटकावलेले आहे. याशिवाय निखिलच्या सरावातही खंड पडणार आहे. निखिलची घरची परिस्थिती हलाखीची असून त्याने खूप कष्ट केले आहेत हे सांगतांना त्याच्या आईला रडू कोसळले.