अनुभवाच्या जोरावर पंतऐवजी कार्तिकला संघात स्थान

    दिनांक :15-May-2019
३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने महिनाभरापूर्वी भारतीय संघाची घोषणा केली. संघात महेंद्रसिंह धोनीला पर्यायी यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत या दोघांची नाव चर्चेत होते. आयपीएलआधी झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमधली कामगिरी पाहता पंत विश्वचषक संघात स्थान पक्क करेल असा अंदाज सर्वांनी बांधला होता. मात्र एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने पंतऐवजी दिनेश कार्तिकला संधी देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने केवळ अनुभवाच्या जोरावर पंतऐवजी कार्तिकला संघात स्थान मिळाल्याचे स्पष्ट केले आहे. 
 
 
“खडतर परिस्थितीमध्ये कसा खेळ करावा याची दिनेशला चांगली माहिती आहे. त्यामुळे बैठकीदरम्यान सर्व जण दिनेशच्या निवडीबद्दल ठाम होते. त्याच्याकडे अनुभव आहे. जर दुर्दैवाने धोनीला दुखापत झाली तर दिनेश यष्टीरक्षणासोबत अखेरच्या फळीत फटकेबाजीचं कामही करु शकतो. त्यामुळे विश्वचषक संघात निवड करताना त्याचा अनुभव आणि इतर सर्व बाबींचा विचार केला गेला.”  एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहली बोलत होता.