पुरुषांच्या फुटबॉल सामन्यात; प्रथमच सर्व महिला रेफरी

    दिनांक :15-May-2019
क्वालालम्पूर, 
पुरुषांच्या कॉन्टिनेंटल क्लब कप फुटबॉल स्पर्धेत प्रथमच सामन्यांचे सूत्र संचालन सर्व महिला रेफरी चमू करणार असल्याची घोषणा आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनने मंगळवारी केली.
 
जपानची रेफरी योशिमी यामाशिता व सहाय्यक माकोतो बोझोनो व नाओमी तेशिरोगी ह्या एएफसी चषक फुटबॉल स्पर्धेत बुधवारी थुवुन्ना स्टेडियम येथे म्यानमारच्या यंगून युनायटेड व कम्बोडियाच्या नागा वर्ल्डदरम्यानच्या सामन्यात पंचगिरी करणार आहेत.
 
 
 
आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनच्या (एएफसी) क्लब स्पर्धेत प्रथमच तीन महिला रेफरी म्हणून आपले कर्तव्य बजावणार आहे. हा निर्णय आशियाई पंचगिरीतला मैलाचा दगड ठरेल, असे एएफसीने म्हटले आहे. यापूर्वी एएफसी कप सामन्यात साहाय्यक रेफरी म्हणून महिला अधिकार्‍यांना नियुक्त केले जायचे. 2014 मध्ये पहिली सहाय्यक महिला रेफरी म्हणून ऑस्ट्रेलियाच्या सराह हो व अलायसन फ्लायन यांनी हा मान मिळविला.
 
हे माझ्या स्वप्नांपेैकी एक स्वप्न आहे, ते खरे होताय्‌ याचा आनंद वाटतो. आमच्या कठीण परिश्रमाची ही फलश्रुती आहे, असे अनुभवी यामाशिता म्हणाली. यामाशिताने 2016 व 2018 साली फिफा अंडर-17 महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत तसेच 2018 मध्ये महिलांच्या आशियाई चषक स्पर्धेत रेफरी म्हणून कार्य केले आहे.
 
या स्पर्धेतील अनुभव आम्हाला जून महिन्यात होणार्‍या फिफा महिलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत होईल, असे बोझोनो म्हणाली.