PAYTM मध्ये १० कोटींचा घोटाळा !

    दिनांक :15-May-2019
आता पुन्हा एकदा पेटीएम ही कंपनी चर्चेत आली आहे. कॅशबॅकच्या माध्यमातून पेटीएमममध्ये १० कोटी रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. खुद्द कंपनीचे प्रमुख विजय शेखर शर्मा यांनी याबाबत माहिती दिली.

 
 
पेटीएममध्ये हा फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर या फसवणुकीशी संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त या फसवणुकीमध्ये सहभागी असलेल्या विक्रेत्यांनाही कंपनीच्या यादीतून काढण्याची कारवाई करण्यात आली आहे. कॅशबॅकच्या नावावर कंपनीमध्ये १० कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक करण्यात आली. दिवाळीनंतर कॅशबॅकच्या नावाखाली मोठी रक्कम वळती होत असल्याची माहिती मिळाल्याचे शर्मा यांनी सांगितले. यावरून कंपनीला संशय आल्यानंतर कंपनीने लेखापरिक्षण सुरू केल्याचे ते म्हणाले. लेखापरीक्षणात कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी कॅशबॅकच्या नावावर ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम दिल्याचे समोर आले. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार हा सुरू निदर्शनास आल्याचेही त्यांनी सांगितले.
कंपनीने या प्रकारानंतर या फसवणुकीत सहभागी असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. तसेच यातील विक्रेत्यांवरही कारवाई सुरू केली असल्याचे शर्मा म्हणाले. नव्या विक्रेत्यांना कंपनीशी जोडण्याचे काम सुरूअसून यापुढे ब्रॅन्डेड विक्रेत्यांनाच सोबत घेण्याचे प्रयत्न केले जातील असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, पेटीएमसारखे प्लॅटफॉर्म प्रोसेसिंग ट्रान्झॅक्शनसाठी देण्यात आलेल्या मर्चंट डिस्काऊंड रेटच्या माध्यमातून नफा मिळवत असतो. तसेच चित्रपटांच्या तिकीटांची विक्री केल्यानंतर त्यातून १५ टक्के रक्कम मिळते. त्यातूनच कशबॅकसारख्या सुविधा देण्यास मदत मिळत असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.