वॉटर कप स्पर्धेतील गावांना मिळणार दीड लाखाचा निधी

    दिनांक :15-May-2019
शासनाचा निर्णय
 
 सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या गावांना शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाकडून प्रत्येकी दीड लाखाचा निधी इंधनासाठी देण्यात येणार असल्याची माहिती पाणी फाऊंडेशनने दिली़ हा निधी जलयुक्त शिवार अभियानाच्या 2019-20 या आर्थिक वर्षात उपलब्ध होणार्‍या निधीतून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
 
 
वॉटर कप स्पर्धेत वापरल्या जाणार्‍या यंत्रांसाठी लागणारे इंधन आता शासनाकडून मिळालेल्या पैशातून भागविण्यात येणार आहे़ वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना मृद व जलसंधारणाची दुष्काळ प्रतिबंधक उपाययोजनांची कामे श्रमदानाद्वारे करतील, अशा गावांना प्रोत्साहन म्हणून यंत्रांद्वारे करण्यात येणार्‍या कामाकरिता इंधनाच्या खर्चातील प्रतिगाव 1 लाख 50 हजार रुपयांचा निधी जलयुक्त शिवार अभियानाच्या 2019-20 या आर्थिक वर्षात उपलब्ध होणार्‍या निधीतून देण्यात येणार आहे.
पाणी फाऊंडेशनमधील सहभागी गावांना शासनाकडून दीड लाखाची मदत करण्यात येणार आहे़ या निधीचा योग्य व पुरेपूर वापर व्हावा यासाठी शासनाचे अधिकारी प्रयत्नशील असणार आहेत़ याशिवाय लोकसहभागातून झालेल्या कामांचा तसेच यंत्रांद्वारे झालेल्या कामांचा तपशील स्वतंत्रपणे ठेवण्याच्या सूचना शासनाने संबंधित जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत़