काँग्रेसला मतदान केल्यामुळे भावावर गोळीबार

    दिनांक :15-May-2019
चंदीगड, 
हरयाणाच्या झज्जर जिल्ह्यात भाजपा समर्थकाने काँग्रेस ला मतदान करणार्‍या चुलत भावावर गोळी झाडल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात राजा नावाचा युवक आणि त्याची आई जखमी झाली आहेत. धर्मेंद्र असे गोळीबार करणार्‍या आरोपीचे नाव आहे, तो या घटनेनंतर फरार झाला आहे.
 
 
 
झज्जरमधील सिलाना गावात मतदानाच्या दिवशी काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावरून रस्सीखेच सुरू होती. राजाला आरोपी धर्मेंद्रने भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र, राजाने असे करण्यास स्पष्ट नकार दिला. तोच राग मनात ठेवून धर्मेंद्रने सोमवारी सकाळी राजाच्या घरी जाऊन त्याच्यावर गोळाबार केला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या राजाच्या आईलाही किरकोळ दुखापत झाली.
 
मात्र, गोळीबारात राजा गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेत राजाला रोहतकच्या पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजाची आणि त्याच्या आईची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
 
गोळी झाडलेली बंदूक अवैध असल्याची माहिती तपास अधिकार्‍यांमार्फत समोर येत आहे. आरोपी धर्मेंद्र फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. धर्मेंद्र विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्याला अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.