ठेवीदारांना फसविणाऱ्या नवोदय अर्बनच्या संचालकांवर गुन्हा दाखल

    दिनांक :15-May-2019
३८.७५ कोटींनी फसविले
नागपूर: ठेवीदारांकडून ठेवी घेऊन अनागोंदी कारभार करीत ठेवीदारांची ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयांनी फसवणूक करीत नवोदय अर्बन को. ऑप. बॅक लि. ला डबघाईस आणणाऱ्या संचालक, पदाधिकारी आणि ठराविक ठेवीदारांविरुद्ध धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

२०१० साली या बँकेची स्थापना करण्यात आली. ठेवीदारांना आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ठेवी जमा केल्या होत्या. काही दिवस ठेवीदारांना व्याज देखील दिले. त्यामुळे ठेवीदारांचा या बँकेवर विश्वास बसला. त्यामुळे हजारो ठेवीदारांनी आपल्या ठेवी बँकेकडे जमा केल्या. त्यानंतर बँकेचे तत्कालिन संचालक मंडळ, बँकेचे पदाधिकारी यांनी बँकेच्या ठराविक कर्जदार इसमांसोबत अन्यायाने संगनमत करून बँकेतील ठेव रकमांचा अपहार केला. त्यात ठराविक कर्जदारांना विनाकारण कर्जवाटप करण्यात आले. काही कर्जदारांकडे कर्जाची थकबाकी असतानाही त्यांच्या तारण मालमत्तेचे मूळ कागदपत्र त्यांना परत केले. याशिवाय कर्जदारांकडे कर्ज थकित असतानाही कर्ज शिल्लक नसल्याचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले. काही प्रकरणात कर्जदाराचे नावे बनावट कर्जवाटप करताना बनावट नोंंदीचे कागदपत्र तयार करून ते खरे असल्याचे भासविण्यात आले. काही प्रकरणात वादग्रस्त मालमत्ता तारण ठेवून कर्जवाटप करण्यात आले. सोबतच बँकेच्या व्यवस्थापकिय संचालक व इतर पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर करून बँकेतून बेकायदेशिररित्या रकमांची उचल केली. रिझर्व्ह बँकेने या बँकेवर आर्थिक निर्बंध लावल्यानंतरही बँकेचे आर्थिक व्यवहार सुरूच ठेवून नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावाने लबाडीने बँकेच्या संगणकांमध्ये लॉगीन करून संगणकातील नोंदीमध्ये फेरफार केले.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भंडारा येथील जिल्हा विशेष लेखा परीक्षक श्रीकांत सुपे यांच्यामार्फत या बँकेच्या व्यवहाराची चौकशी करण्यात आली. त्यात बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. तसा अहवाल सुपे यांनी गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे दिला. त्यावरून बँकेचे संचालक, पदाधिकारी आणि ठराविक ठेवीदार यांच्यावर धंतोली पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.