'ममतांच्या वादग्रस्त छायाचित्रासाठी माफी मागणार नाही'

    दिनांक :15-May-2019
कोलकाता, 
 
ममता बॅनर्जी यांचे फेरफार केलेले छायाचित्र समाज माध्यमावर टाकण्यासाठी माफी मागणार नाही, अशी भूमिका भाजपाची महिला कार्यकर्ता प्रियांका शर्मा यांनी घेतली आहे. ममता यांचे वादग्रस्त छायाचित्र समाजमाध्यमांवर टाकल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या आदेशानंतर त्यांची आज बुधवारी सुटका करण्यात आली.
 

 
 
केलेल्या कृत्यासाठी मला कोणताही खेद नाही. कुणाची माफी मागावी असे कोणतेही कृत्य मी केलेले नाही, असे शर्मा यांनी भाजपा कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत बोलताना सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यावर पाच दिवसांनंतर आज सकाळी 9.40 वाजता त्यांची अलिपूर तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगात आपला छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तुरुंगात माझा छळ करण्यात आला. तुरुंगाधिकार्‍याने सोमवारी मला जोरदार धक्का दिला. कोठडीत धक्का देऊन पाठवण्यासाठी मी गुन्हेगार नाही, असेही मी त्यांना सांगितले. मला तुरुंगात कठोर वागणूक देण्यात आली. तुरुंगात माझी अवस्था अत्यंत वाईट होती, असा आरोपही त्यांनी केला.
 
माझ्याकडून बळजबरीने माफीनामाही लिहून घेण्यात आल्याचे प्रियांकाने सांगितले.