पंतप्रधानांविरोधी वक्तव्य; राहुल गांधींवर दखलपात्र गुन्हा नाही

    दिनांक :15-May-2019
-दिल्ली पोलिसांची न्यायालयास माहिती
 
नवी दिल्ली, 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राहुल गांधी यांनी 2016 मध्ये केलेल्या अवमानजनक वक्तव्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून त्यांच्याविरोधात दखलपात्र गुन्हा नोंदवला नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी आज बुधवारी न्यायालयास दिली.
 
 
 
अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी समर विशाल यांच्यासमोर आज दिल्ली पोलिसांनी कारवाई अहवाल सादर केला. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासाठी त्यांच्याविरोधात खटला दाखल करणे शक्य असल्याचे पोलिसांनी या कारवाई अहवालात म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केलेली नाही. तक्रारीचा सार लक्षात घेता, यात दखलपात्र गुन्हा नाही. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेले अवमानजनक वक्तव्य लक्षात घेता, ज्याच्याविरोधात राहुल गांधी यांनी वक्तव्य केले, ती व्यक्ती राहुल गांधी यांच्याविरोधात वैयक्तिक पातळीवर अवमानना याचिका दाखल करू शकते, असेही पोलिसांनी सादर केलेल्या कारवाई अहवालात म्हटले आहे.
 
राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याच्या मागणीसाठी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 26 एप्रिल रोजी सुनावणी करताना न्यायालयाने, या प्रकरणी कारवाई अहवाल दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.