मुंबई : एचआयव्हीग्रस्त महिलेवर रुग्णालयात बलात्कार

    दिनांक :15-May-2019
मुंबई :शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात एका भुरट्या चोराने वैद्यकीय मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून एचआयव्ही बाधित महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यातील एका खेड्यात राहणारी ३७ वर्षांची महिला लहान बहिणीला घेऊन शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात काही दिवसांपूर्वी आली होती. तिच्या बहिणीवर मूत्रपिंडाच्या आजारासाठी उपचार सुरू होते. या काळात रुग्णालयाच्या आवारात फिरणाऱ्या धारावीतील या आरोपीने तिला मदत करण्याच्या बहाण्याने ओळख वाढवली. डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांशी आपली ओळख असून बहिणीवर उपचारांसाठी मदत करू, असे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने या महिलेला रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागाच्या (ओपीडी) इमारतीच्या छतावर आणून बलात्कार केला. त्यानंतर या महिलेने शीव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला धारावीतून अटक केली. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडी केली आहे. हा आरोपी चोऱ्या करण्यासाठी लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या परिसरात येत असे.