राज्यात १९७२ पेक्षा भीषण दुष्काळ: शरद पवार

    दिनांक :15-May-2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील काही भागांचा दौरा केला. पवारांच्या मते यंदा राज्यात  १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. संपूर्ण दुष्काळी भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्याची वेळही पवार यांनी मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील टप्पा संपताच सोलापूर, सातारा, बीड, उस्मानाबाद, अहमदनगर या दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.  शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी यावर कोणत्या उपाययोजना करायला हव्यात यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पवारांनी पत्र लिहिले आहे. या पत्रात शेतकऱ्यांचे प्रश्न, मुद्दे, त्यांच्यासमोरील समस्या आणि दुष्काळावर काय उपाययोजना कराव्यात, याबाबतचे सविस्तर म्हणणे मांडले आहे. तर दुसरीकडे राज्याच्या ग्रामीण भागातील दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेलिफोनिक कॉन्फरन्स द्वारे गावातील सरपंचांशी चर्चा करून तात्काळ तोडगा काढला आहे.