नागपूर : लाचखोर अभियंत्यासह दोघांना अटक

    दिनांक :15-May-2019

 
 
नागपूर: वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजाराची लाच घेणाऱ्या एका कनिष्ठ अभियंत्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.
कनिष्ठ अभियंता प्रदीप सुदामा शर्मा (३१) आणि वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र रामचंद्र बुंधाळे (५९) अशी या लाचखोरांची नावे आहेत. शर्मा आणि बुंधाळे हे वीज वितरण कंपनीच्या काटोल ग्रामीण २ कार्यालयात कार्यरत आहेत.
याप्रकरणी माहिती अशी, तक्रारदार हे गांधी गेट, महाल येथील निवासी आहेत. त्यांचे अगरबत्ती आणि परफ्युमचे दुकान आहे. तक्रारदाराच्या नावाच्या नावे ढवळापूर हेटी (ता. काटोल) येथे शेती आहे. शेतीची देखभाल करण्याचे काम तक्रारदाराकडे आहे. शेतात इलेक्ट्रीक लाईन घेण्यासाठी त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले होते. वीजपुरवठा घेण्यासाठी वीज कार्यालयात कागदपत्रे जमा करण्यासाठी तक्रारदाराला फोनद्वारे कळविण्यात आले होते.
९ मे रोजी तक्रारदार हे काटोल येथील वीज वितरण कार्यालयात गेले आणि त्यांनी शर्मा यांची भेट घेतली. त्यावेळी शर्मा यांनी ऑनलाईन फॉर्म चुकीचा भरल्याचे तक्रारदाराला सांगितले. त्यानंतर शर्मा व बुंधाळे हे तक्रारदाराच्या शेतात गेले. त्यावेळी तक्रारदाराने शेतात पाणी देण्यासाठी अवैधरित्या वीजपुरवठा घेतल्याचे लक्षात आले. त्यामुळे शर्मा यांनी तक्रारदाराला पोलिसात गुन्हा दाखल करतो असे म्हटले. वीजचोरीचा गुन्हा दाखल करायचा नसेल तर २५ हजाराची मागणी केली. तक्रारदारास पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर तक्रारदार आणि शर्मा यांच्यात तडजोड झाल्यानंतर त्यांच्यात १० हजार रुपये घेण्याचे ठरले. तक्रारदाराने बुंधाळे यांच्या हातात पैसे देताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी दोघांनाही पकडले. याप्रकरणी काटोल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक केली.