पाकिस्तानी रुपया आणखी गडगडला; लवकरचं १५० गाठणार?

    दिनांक :16-May-2019
तभा ऑनलाईन टीम 
इस्लामाबाद,
पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली आहे. एक डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य १४१ वर पोहोचले आहे. तसेच येत्या काही दिवसात पाकिस्तानी रुपया १५० पर्यंत आणखी खाली जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केल्यामुळे पाकिस्तानात महागाईचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
 
 
पाकिस्तान दैनंदिन वापरातल्या अनेक वस्तू, खनिज तेल आयात करतो. पाकिस्तानात रुपयाचे मूल्य सातत्याने कमी होत असल्याने महागाई झपाट्याने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने बेलआऊट डील केल्यावर पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली. काल एका डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया तब्ब्ल १४७ पर्यंत घसरला होता. त्यात आज थोडी सुधारणा झाली.
 
पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत झालेल्या करारातील अटी, शर्ती अद्याप समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे व्यावसायिक आणि गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे अनेकांनी गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला बसला आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानला येत्या अर्थसंकल्पात वीज आणि गॅसच्या किमती वाढवाव्या लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत केलेल्या करारात पाकिस्ताननं ही अट मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.