तिहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप

    दिनांक :16-May-2019
वरूडच्या बारगाव येथील प्रकरण
 
अमरावती: वरूड तालुक्यातील बारगाव येथे अनैतिक संबंधातून घडलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने गुरूवारी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मनोजसिंग पंजाबसिंग भादा (30) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे.
दोषारोपपत्रानुसार, पंजाबसिंग भादा (30), अंजूरा रामेश्वर उईके (28) व गोपाल बिरजू उईके (24) अशी हत्याकांडातील मृत व्यक्तींची नावे आहेत. मनोज भादा हा त्याच्या कुटूंबासह वरूड तालुक्यातील बारगाव येथे राहत होता. त्याच परिसरात मृतक अंजूरा उईके व तिचा दीर गोपाल बिरजू देखील राहत होता. मनोजसिंग याचे अंजूरासोबत अनैतिक संबंध होते. परंतु, अंजूराचा पती बाहेरगावी गेल्याने गोपाल उईके याचे घरी जाण्यावरून मनोजसिंग याला संशय येत होता. दूसरीकडे मनोजसिंग याने अंजूरा सोबत संबंध ठेवू नये यासाठी त्याचे वडील पंजाबसिंह भादा नेहमी त्याला सांगत होते. त्यामुळे तो वडीलांचा देखील राग करीत होता. 23 जानेवारी 2015 रोजी रात्री साडे अकरा वाजताचे सुमारास मनोजसिंग याचा भाऊ राजेशसिंग भादा याला गोळी चालविल्याचा आवाज आला. त्याच वेळी त्याची बहीण रडत घराबाहेर येताना दिसली. मनोजसिंह याने वडीलांवर गोळी झाडल्याचे तिने राजेशसिंह याला सांगितले. राजेशसिंह याने घरात जावून पाहीले असता त्याला वडील पंजाबसिंग भादा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.
 

 
 
 
यानंतर काही वेळात मनोजसिंग याने याच परिसरात राहणार्‍या अंजूरा उईके व तिचा दीर गोपाल उईके यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केली. तिहेरी हत्याकांडाची माहीती मिळताच बेनोडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनेच्या दुसर्‍या दिवशी 24 जानेवारी 2015 रोजी मनोजसिंग भादा याला ताब्यात घेतले. त्याचा भाऊ राजेशसिंह भादा याच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात हत्या, घातक शस्त्र बाळगणे व 449 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
बेनोडा पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक निरीक्षक मुकुंद ठाकरे यांनी 20 एप्रील 2015 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. याप्रकरणात सरकारी वकील अ‍ॅड. परीक्षित गणोरकर, सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. दिलीप तिवारी व अ‍ॅड. संदीप ताम्हणे यांनी युक्तीवाद केला. न्यायालयीन सुनावणी दरम्यान एकुण सात साक्षीदारांचे बयान नोंदविले. जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक 3) विमलनाथ तिवारी यांनी आरोपी मनोजसिंग भादाला या तिनही हत्या प्रकरणात वेगवेगळ्य जन्मठेपेच्या शिक्षा, एक हजार रूपये दंड व कलम 449 प्रमाणे 10 वर्षाचा कारावास व 500 रूपयाचा दंड ठोठावण्यात आला.