माधुरी स्टाईल

    दिनांक :16-May-2019
सृष्टी परचाके
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आपल्या स्टाईलसाठी ओळखले जात असून त्यांची हटके स्टाईल तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. चित्रपटामध्ये लूक आणि कपड्यांवर जास्त मेहनत घेण्यात येते. अनेक चित्रपट त्याच्यामध्ये परिधान केलेल्या कपड्यांमुळे गाजले आहेत. यात ‘मुघल-ए-आजम’, ‘हम आपके है कौन’ आणि ‘जोधा अकबर’ सारख्या चित्रपटामध्ये हटके आणि महाग आऊटफिट वापरण्यात आले होते. आताही या आऊटफिट्स बद्दल चर्चा केली जाते.

 
 
माधुरी दीक्षित आजसुद्धा तिच्या स्टाईलमुळे युवा वर्गामध्ये प्रसिद्ध आहे. तिच्या चित्रपटांसह तिने परिधान केलेले आऊटफिट सुद्धा प्रसिद्ध झाले. माधुरीच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा कलंकमध्ये चाहत्यांना अनुभवायला मिळाली. या चित्रपटामधील जर तुम्ही माधुरीचा लूक पाहिला तर, पारंपरिक वेषभूषेमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसते आहे. माधुरीने आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. तिचे मॉर्डन आउटफिट गेटअप देखील अनेक चित्रपटांमध्ये गाजले.
 
हम आपके है कौन
सलमान आणि माधुरीच्या या सुपरहिट चित्रपटामध्ये अनेक विविध पारंपरिक आणि वेस्टर्न आऊटफिट्स पाहायला मिळाले. माधुरी दीक्षितने या चित्रपटात अनेक हटके आऊटफिट्स परिधान केले. तिची जांभळ्या रंगाची साडी आज सुद्धा महिलांमध्ये प्रसिद्ध आहे. जांभळ्या रंगाच्या साडीवर नक्षीदार काम करण्यात आले होते. या चित्रपटातील वेस्टर्न लूकही भलतेच गाजले होते.
 
देवदास
१९९९ मध्ये माधुरीने डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केले. त्यानंतर माधुरीने देवदास चित्रपटामध्ये काम केले. या चित्रपटात माधुरीने साकारलेली चंद्रमुखीची भूमिका विशेष गाजली होती. चित्रपटामध्ये कपड्यांवर विशेष लक्ष देण्यात आले होते. ‘मार डाला’ गाण्यामध्ये माधुरीने हिरव्या रंगाचा वजनी लेहेंगा परिधान केला होता. हा लेहेंगा खास या गाण्यासाठी बनविण्यात आला होता. तसेच ‘डोला रे डोला’ गाण्यातील पांढरी साडीसुद्धा त्यावेळी ट्रेंडिंगमध्ये होती. देवदास चित्रपटानंतर माधुरीने इंडस्ट्रीमधून मोठा ब्रेक घेतला आणि अमेरिकेत स्थलांतर झाली.
 
आजा नचले
२००७ मध्ये माधुरीने अनिल मेहता यांचा चित्रपट ‘आजा नचले’मधून कमबॅक केले. या चित्रपटाचे गाणे ‘आजा नचले’ जबरदस्त हिट झाले होते. त्याचबरोबर गाण्यामध्ये माधुरीने परिधान केलेला निळ्या आणि काळ्या रंगाचा लेहेंगाही चाहत्यांमध्ये हिट ठरला होता. चित्रपटामध्ये परिधान केलेले ट्यूनिक आणि जीन्स सुद्धा महिलांमध्ये प्रसिद्ध झाले. माधुरीने परिधान केलेल्या विविध रंगाच्या लेहेंगांची चर्चा आताही होते.
 
ये जवानी है दिवानी
या चित्रपटामध्ये अनेक हटके स्टाईलिश वेशभूषा पाहायला मिळाले. 2013मध्ये आलेल्या या चित्रपटाचं ‘घागरा’ गाणं प्रचंड गाजलं होतं. गाण्यामधील माधुरीची स्टाईल आणि आऊटफिट हटके होते.
 
कलंक
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कलंक’ चित्रपटामध्येही माधुरीची हटके स्टाईल आपल्यला पाहायला मिळाली. तिने परिधान केलेले लॉन्ग अनारकली आणि लेहेंगा आता सुद्धा ट्रेंडिंगमध्ये आहे. तसेच त्याच्यावर परिधान केलेले दागिने सुद्धा तितकेच गाजले. २०१४ मध्ये माधुरी दीक्षितने 'देढ इश्किया'मध्ये मुख्य भूमिकेत दिसून आली. मराठी चित्रपट 'बकेट लिस्ट'मध्ये माधुरीने गृहिणीची भूमिका निभावली होती. या चित्रपटामध्ये माधुरीने साधी साडी परिधान केली होती.