धक्कादायक! उपचार सुरु असताना तोंडात स्फोट झाल्याने महिलेचा मृत्यू

    दिनांक :16-May-2019
रुग्णालयात उपचार सुरु असताना तोंडात स्फोट झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आली आहे. उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे ही घटना घडली आहे. बुधवारी रात्री महिलेने विषप्राशन केले होते. यानंतर उपचारासाठी महिलेला अलीगढ येथील जे एन मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले होते.
 
 
डॉक्टरांनी महिलेवर उपचार करण्यास सुरुवात केली असता यादरम्यान तोंडात स्फोट झाला. विष बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांनी तोंडाद्वारे नळी टाकली असता अचानक हा स्फोट झाला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने सल्फरीक अॅसिड घेतले होते. नळी आतमध्ये टाकली असता ऑक्सिजनशी संपर्क आल्यानेच हा स्फोट झाला असावा अशी शक्यता आहे. दरम्यान हा स्फोट होण्याचे नेमके काय कारण आहे याचा शोध घेतला जात आहे अशी माहिती रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.