काँग्रेस नेत्यांचा दूष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांशी संवाद

    दिनांक :16-May-2019
समितीचा चांदूर रेल्वे, चांदूर बाजार तालुक्यात दौरा
 
 
 
तभा ऑनलाईन टीम  
अमरावती,
चांदूर बाजार व चांदूर रेल्वे तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्या नेतृत्वातल्या काँग्रेसच्या समितीने केली. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्यांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचा निर्धार समिती सदस्यांनी व स्थानिक नेत्यांनी यावेळी केला.
 
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जि.प. सदस्य बबलू देशमुख यांच्या प्रयत्नाने चांदूर बाजार तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेस समिती आली होती. त्यांनी घाटलाडकी परिसरातल्या दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन माहिती घेतली. घाटलाडकी परिसरातील शेतकर्‍यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी शेतकरी सतीश राजस यांच्या शेतातील पाण्याअभावी वाळलेल्या संत्रा झाडांची पाहणी समिती सदस्यांनी केली. मागील वर्षी अत्यल्प पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना यावर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळाची स्थितीवर ठोस उपाययोजना करणे गरजेचे होते. परंतु, आमदार व प्रशासन देखील ठप्प असल्याने जनतेला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याची दखल घेण्यात न आल्याचे बबलू देशमुख यांनी समिती सदस्यांना सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
  
आमला वासीयांशी साधला संवाद
काँग्रेसची दूष्काळ पाहणी समितीचे सदस्य चांदूर रेल्वेत दाखल होताच त्यांनी मुख्याधिकारी यांना दुष्काळस्थितीचे निवेदन दिले. त्यानंतर तालुक्यातील आमला (विश्वेश्वर) येथे जाऊन ग्रामस्थांच्या समस्या व दुष्काळाची दाहकता जाणून घेतली. जवळपास 1 तास या समितीने गावकर्‍यांशी चर्चा केली. यानंतर समितीने पुढील दौर्‍याकरीता प्रस्थान केले. आमला गावात चारा टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत आहे.
 
गावात पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नसुन पुरक नळ योजना सुध्दा नाही. हीच परिस्थिती जाणुन घेण्यासाठी व सभागृहात सदर स्थिती मांडण्यासाठी काँग्रेस समिती आमला गावात आल्याचे माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांनी यावेळी सांगितले. समितीमध्ये आमदार वीरेंद्र जगताप, आमदार यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख नाजीम मोहीम खरीप, राहुल बोंद्रे, अतुल लोंढे, जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे यांचा समावेश होता.