वेड #PUBG चे

    दिनांक :16-May-2019
•सर्वेश फडणवीस
8668541181 
 
उन्हाळ्याची सुटी चालू आहे. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडी सध्या या गेमचे नाव आहे. सध्या सगळीकडे ‘पबजी’ या गेमची चर्चा आहे. या गेमचे अनेक मुलांना व्यसनच लागल्यासारखे ते खेळताना दिसतात. मात्र या पबजीमुळे पुन्हा एकदा वेड्यासारखी गेम खेळणारी ही मुले नवनवीन धोक्यांना आमंत्रण देताना दिसतं आहेत. या गेमचे व्यसन अतिशय वाईट आहे. आपल्या पंतप्रधान यांनी पण या खेळाच्या बाबतीत चिंता व्यक्त केलेली आपण जाणतोच. 

 
 
‘पबजी’ हा शब्द ‘प्लेअर अननोन बॅटल ग्राऊण्ड’ या टर्मचा शॉर्टकट आहे. अर्थात गेमच्या नावावरूनच अनोळखी लोकांशी मारामारी करणे हा या गेमचा मूळ उद्देश असतो हे सहज लक्षात येईल, असा हा गेम आहे. आकर्षक व्हिज्युअल्स आणि सतत होत राहणार्‍या ॲक्शनमुळे प्रत्येकाला या गेमची सवय लागली आहे. वाळवंट, शहर, जंगल आणि बर्फ अशा चार थीममध्ये एकटा, दोघांची अथवा चौघांची टीम बनवून हा गेम खेळला जातो. एका बॅटलफिल्टमध्ये 100 अनोळखी गेमर्स एका वेळेस हा गेम खेळतात. गेम खेळण्यासाठी दिलेली जागा हळूहळू कमी होत जाते, त्यामुळे एकमेकांना ठार करून शेवटी जिवंत राहणारा या गेममध्ये जिंकतो. या गेममध्ये हॉकी स्टिक्स, एके47 , मशीनगन्स, तलवारीच्या साहाय्याने समोरच्या गेमरला ठार मारले जाते.
 
फेसबुकवर लॉगइन करून त्याच्या मदतीने गेम खेळल्यास आपल्या फेसबुक मित्रांबरोबर टीम करून हा गेम खेळता येतो म्हणूनच अनेक जण वेळ ठरवून भेटतात ते या गेमच्या प्लॅटफॉर्मवरच. या गेमचे वैशिष्ट्य म्हणजे हा गेम खेळताना आपल्या पार्टनरशी लाईव्ह चॅटिंगही  करता येते. लाईव्ह चॅटिंगमुळे हा गेम इतका लोकप्रिय झाला आहे. आता यात हिंसा असल्याने हा गेम केवळ अठरा वर्षांवरील मुलांसाठीच आहे. मात्र आता स्मार्टफोन वापरणारी सर्वच वयोगटांतील मुले हा गेम स्वत:च्या किंवा आईबाबांच्या मोबाईलवरून खेळताना दिसतात. या गेममुळे मुलांमधील हिंसक वृत्ती वाढण्याची शक्यता असून त्यांच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो, असे मत व्यक्त केले जाते आहे त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे.
 
अँग्री बर्डस, टेम्पल रन, कॅण्डी क्रॅश, सब वे सर्फर, ब्लु व्हेल याच रांगेत आता पबजी आलेला आहे. गेम खेळता खेळता अनेक जण गेमच्या इतके आहारी गेले आहेत की आपल्या आजूबाजूला जग आहे हे विसरून जातात व गेमलाच आपले खरे आयुष्य समजतात आणि तसेच करण्याचा प्रयत्न करत आहेत. मागच्या वर्षी असाच एक ब्लु व्हेल हा गेम आला होता, त्याचे दुष्परिणाम आपण अजूनही बघतो आहेच.
 
या आभासी जगात कुठल्या गोष्टीच्या किती आहारी जायचे आणि किती अडकायचे हे ठरवण्याची वेळ आली आहे, यातून बाहेर लवकरात लवकर नाही पडलो तर त्याचे परिणाम भयंकर होतील. तेव्हा वेळीच सावध होत जागे होण्याची गरज आहे.