सायबर हल्ल्याच्या शक्यतेने अमेरिकेत राष्ट्रीय आणिबाणी

    दिनांक :16-May-2019
- ट्रम्प यांचा धाडसी निर्णय
- हुवेई कंपनी निगराणी यादीत
 
 
वॉशिंग्टन, 
 
हुवेई कंपनीला निगराणी यादीत टाकण्याचा निर्णय घेतानाच, अमेरिकेत मोठ्या सायबर हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात राष्ट्रीय आणिबाणी घोषित केली आहे. परकीय शत्रूंपासून अमेरिकेतील संगणकीय जाळ्याचे रक्षण करण्यासाठी ट्रम्प यांनी हे धाडसी पाऊल उचलले आहे.
 
 
 

 
 
 
 
 
या निर्णयामुळे अमेरिकन कंपन्यांना आणिबाणीच्या काळात राष्ट्रीय सुरक्षेत अडचण आणणार्‍या विदेशी दूरसंचार कंपन्यांची सेवा वापरता येणार नाही. ट्रम्प यांनी या संदर्भातील आदेशावर स्वाक्षरी केली असल्याची माहिती व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव सारा सँडर्स यांनी दिली.
 
व्हाईट हाऊसने जारी केलेल्या आदेशात कोणत्याही विदेशी कंपनीचे नाव नमूद करण्यात आले नाही; मात्र हुवेई कंपनीला लक्ष्य करण्यासाठी ट्रम्प यांनी आणिबाणी घोषित करण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे, कारण हुवेई कंपनीला ट्रम्प यांनी निगराणीच्या यादीत टाकले आहे.
 
 
 
 
अमेरिकेत आणिबाणी लागू होताच हुवेई कंपनीने, यामुळे केवळ अमेरिकन कंपन्या आणि नागरिकांचेच नुकसान होणार असल्याचे म्हटले आहे. हुवेईच्या उत्पादनांचा वापर चीनकडून नजर ठेवण्यासाठी केला जात असल्याची चिंता अमेरिकन कंपन्यांनी अनेकदा व्यक्त केली होती.
 
दरम्यान, अमेरिकेच्या व्यापार मंत्रालयाने हुवेईचा समावेश निगराणी यादीत केला असल्यामुळे अमेरिकन कंपन्यांमधील तंत्रज्ञान ताब्यात घेताना हुवेईला सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे अमेरिका आणि चीनचे संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.