पत्नीचा प्रियकर आणि त्याच्या बहिणींना झाडाला बांधून बेदम मारहाण

    दिनांक :16-May-2019
मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील अर्जुन कॉलनी परिसरात मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. युवक विवाहित महिलेसोबत पळाला म्हणून त्याला आणि त्याच्या दोन चुलत बहिणींना झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली आहे. सर्वांसमक्ष अनेक तास हा निंदनीय प्रकार सुरु होता. 
 
 
हल्लेखोरांमध्ये महिलेचा पती सुद्धा होता. या तिघांना झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. मुलींचा विनयभंग करण्यात आला. युवक आणि महिलेला पळून जाण्यासाठी मदत केली म्हणून मुलींना मारहाण करण्यात आली. हे सर्व घडत असतान शंभरच्या आसपास लोक तिथे जमले होते. पण कोणीही त्यांची मदत करण्यासाठी पुढे आले नाही.
लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी नऊ जणांविरोधात एफआयआर दाखल केला असून त्यातील चार जण फरार आहेत. आतापर्यंत पाच जणांना पोलिसांनी टक केली असून त्यात तीन महिला आणि दोन पुरुष आहेत.
 
 
मुख्य आरोपी मुकेशची पत्नी काही दिवसांपूर्वी प्रियकरासोबत पळून गेली होती. दाही पोलीस स्टेशनमध्ये त्याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्याला पत्नीची माहिती मिळाली. त्याने पत्नीच्या प्रियकराशी संर्पक साधून तडजोडीसाठी अर्जुन कॉलनी येथे बोलावले. जेव्हा युवक त्याच्या बहिणींसोबत तिथे पोहोचला तेव्हा मुकेश आणि त्याच्या कुटुंबियांनी तिघांना झाडाला बांधून मारहाण केली.