चाहत्यांचे प्रेम पाहून वॉटसन भावूक, दिला 'हा' संदेश

    दिनांक :16-May-2019
आयपीएलच्या शेतीच्या सामन्यात चेन्नईकडून शेन वॉटसनने एकाकी झुंज दिली. एका बाजूने गडी बाद असताना शेन वॉटसनचे मात्र संयमी खेळी करत झुंजार अर्धशतक ठोकले. अर्धशतकानंतर त्याने तुफान फटकेबाजी केली पण दुहेरी धाव घेताना तो शेवटच्या षटकात ८० धावांवर धावचीत झाला. त्याने ५९ चेंडूत ८० धावा केल्या. पण महत्वाचे म्हणजे ही खेळी त्याने पायाला दुखापत झालेली असताना आणि त्या जखमेतून रक्त वाहत असताना केली. चेन्नई संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग याने याबाबत माहिती दिली.
 
 
त्यानंतर शेन वॉटसनचे केवळ चेन्नईच्याच नव्हे तर सर्व क्रिकेटचाहत्यांनी कौतुक केले आणि त्याला पाठिंबा दर्शविला. चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंबा पाहून शेन वॉटसन भावूक झाला आणि त्याने एका व्हिडिओच्या माध्यमातून एक भावनिक संदेश दिला.
 
 
 
“गेल्या काही दिवसात चाहत्यांनी मला जे प्रेम दिले आणि ज्या प्रकारचा पाठिंबा दर्शविला ते पाहून मी खूपच भावूक झालो आहे. अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. या सामन्यात चेन्नईसाठी मला सामना जिंकता आला नाही. मुंबईला विजेतेपद मिळाले. पण पुढील वर्षी आम्ही दमदार पुनरागमन करू”, असे वॉटसन म्हणाला.