'ज्यांचे 8-10 जागा निवडून येतात, तेदेखील आता पंतप्रधान होण्याचे स्वप्नं पाहत आहे'

    दिनांक :16-May-2019
चंदोली,
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या महाआघाडीवर निशाणा साधला आहे. स्वप्न पाहणे चुकीचे नाही. पण अबकी बार मोदी सरकार हे जनतेने मनाशी ठरवले आहे, असं मोदी उत्तर प्रदेशातल्या चंदोलीमधल्या जनसभेला संबोधित करताना म्हणाले.
 
 
ज्यांच्या 8-10, 20-22, 30-35 जागा निवडून येतात, तेदेखील आता पंतप्रधान होण्याची स्वप्नं पाहू लागले आहेत, असा टोला लगावत मोदींनी महाआघाडीतल्या अनेक नेत्यांना लक्ष्य केले. स्वप्न पाहण्यात काहीही गैर नाही. पण यंदा मोदी सरकारच येणार, हे जनतेने ठरवले आहे, असे मोदींनी म्हटले. देशाला स्थिर सरकार कसे देणार याचे उत्तर अद्याप विरोधकांच्या आघाडीला सापडलेले नाही, अशा शब्दांत त्यांनी महाआघाडीला लक्ष्य केले. विरोधकांची महाआघाडी महामिलावट असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
 
 
 
 
 
 
दहशतवादाच्या मुद्द्यावर सरकारचे धोरण स्पष्ट असल्याचे मोदी म्हणाले. 'देशाच्या जवानांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होणार नाही. आम्ही दहशतवाद्यांना घरात घुसून मारू. भारतात राहून पाकिस्तानचे गुण गाणाऱ्या फुटीरतावाद्यांना आम्ही कठोरपणे हाताळत आहोत,' असं मोदींनी म्हटले. यावेळी त्यांनी पूर्वांचलमधल्या शेतकऱ्यांचे तोंडभरुन कौतुक केले. 'पूर्वांचलमधल्या शुगर फ्री तांदळाची खूप चर्चा होत आहे. वाराणसीत आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे. चांगले बियाणे निवडण्यासाठी, पिकाची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना या केंद्राची मदत होईल,' असे मोदी म्हणाले.