घर विकून ‘त्याने’ तयार केला आगळावेगळा तिरंगा!

    दिनांक :16-May-2019
- एका धाग्यात व एकाच कपड्यात विणला
 
 
हैदराबाद, 
 
आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने आपल्या इच्छेनुसार आगळावेगळा तिरंगा तयार करण्यासाठी आपले हक्काचे घर विकले आणि चार वर्षांच्या अथक परिश्रमातून हा वैशिष्ट्यपूर्ण तिरंगा साकारला आहे.
 
आर. सत्यनारायण असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांनी वेगळ्या पद्धतीने तिरंगा साकारण्याचा निश्चय केला होता. त्यांना एकाच कपड्यात कुठल्याही पद्धतीची शिलाई नसलेला तिरंगा तयार करायचा होता. अनेक वर्षांपासून मनात असलेला हा तिरंगा तयार करण्यासाठी साडेसहा लाख रुपयांची गरज होती; मात्र तेवढी रक्कम जवळ नसल्याने, स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्यात अडथळे येत होते. अखेर सत्यनारायण यांनी आपले घर विकून साडे सहा लाख रुपयांची रक्कम उभी केली. त्यानंतर सुमारे चार वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांच्या मनासारखा तिरंगा साकार झाला.
 
 
 
 
आठ बाय बारा फूट आकाराचा हा तिरंगा साकारणे, सत्यनारायण यांच्यासाठी वेगळा अनुभव होता. केवळ एका धाग्याने एकाच कपड्यावर तयार केलेला एकही तिरंगा नव्हता. सर्व तिरंगे केसरी, पांढरा आणि हिरव्या या तीन रंगांच्या कापडांना एकत्र शिवून तयार केले जातात. हा तिरंगा लाल किल्ल्यावर फडकावण्यात यावा, अशी इच्छा सत्यनारायण यांनी व्यक्त केली आहे.
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक सभेसाठी विशाखापट्टणम्‌ येथे आले असता, सत्यनारायण यांनी हा तिरंगा मोदींच्या स्वाधीन केला, मात्र या तिरंग्याची वैशिष्ट्ये सांगण्याची संधी त्यांना मिळाली नाही. हा तिरंगा तयार करण्याची प्रेरणा मला ‘लिटिल इंडियन’ नावाच्या लघुकथेतून मिळाली. यात नायक तिरंग्यातील तीन रंगाना एकत्र करून तिरंगा तयार करतो, असे सत्यनारायण यांनी सांगितले.