अबब ! दोन व्यक्तीला एकच खाते क्रमांक; सेंट्रल बँकेतून दोन लाख रुपये गायब

    दिनांक :16-May-2019
तभा ऑनलाईन टीम  
शिरजगाव कसबा,
अमरावती जिल्ह्यातल्या शिरजगाव कसबा पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या करजगावमधील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा गलथान कारभार समोर आला. एकच खाते क्रमांक दोन व्यक्तीला देण्यात आला. परिणामी खात्यातून दोन लाख रुपये काढण्यात आल्यावर ज्या ग्राहकाने ही रक्कम लाटली, आता तो ‘तो मी नव्हेच’ची भूमिका घेत आहेत.

 
करजगाव येथील रहिवासी फिरोजा बानो सलीम शहा यांच्या 3383775016 या खाते क्रमांकामध्ये त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मोलमजुरी करून 17 नोव्हेंबर 2016 ला दोन लाख रुपये जमा केले होते. मुलीच्या लग्नासाठी पैसे बँकेमध्ये सुरक्षित आहेत, असे समजून त्यांनी कानाडोळा केला. लग्नाला वेळ असल्याने त्या पैशाकडे लक्ष दिले नाही. 2019 मध्ये मुलीचे लग्न जुळले आणि पैशांची गरज भासली तेव्हा फिरोजा बानो आणि त्यांचे पती जेव्हा बँकेमध्ये पैसे काढण्याकरिता गेले, तेव्हा खात्यातील सर्व पैसे काढण्यात आल्याचे कॅशियरने सांगितले.
 
या खात्यामध्ये एवढे पैसे नाही हे ऐकल्यानंतर फिरोजा बानो आणि त्यांचे पती चकित झाले आणि त्यांच्यासमोर एकच प्रश्न समोर उभा राहिला की खात्यातील पैसे गेले कुठे, आणि कोणी काढले. त्यांनी लगेच बँक शाखा प्रबंधकांसोबत संपर्क साधून पूर्ण माहिती घेतली तेव्हा समजले की बँकेने चुकीने त्यांचाच खाते नंबर दुसर्‍याही ग्राहकाला दिल्यामुळे हा सर्व प्रकार घडला. दुसर्‍या ग्राहकाने मात्र याचा नेमका फायदा घेऊन 2 लाख रुपये काढून घेतले.
 
फिरोजा बानो यांनी बँकेमध्ये तक्रार केली आणि पैसे परत मिळण्याची मागणी केली. बँकेने याकडे कानाडोळा करीत पैसे परत मिळून जाईल, असे सांगितले. बानो यांनी 20 जानेवारी 2019 ला बँकेला याची लेखी तक्रार सुद्धा केली होती. यावर बँक लवकरात लवकर अ‍ॅक्शन घेऊन पैसे परत मिळवून देईल, असे वाटत होते. मात्र, परत तक्रार करूनसुद्धा त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. शेवटी कडक तक्रार केल्यानंतर 11 मे 2019 ला शाखा प्रबंधकांनी शिरजगाव कसबा पोलिस स्टेशनमध्ये विड्रॉल करणार्‍या व्यक्तीच्या नावे तक्रार केली. त्या आधारावर पोलिस पुढील तपास करीत आहे.