कारच्या धडकीत दोन दुचाकीस्वार जागीच ठार

    दिनांक :16-May-2019

 
 
कारमधील ती महिला कोण?
कारंजा घाडगे: पेट्रोलपंपाकडे पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीने जात असतांना भरधाव वेगात येणाऱ्या कारची दुचाकीला जोरदार धडक बसून झालेल्या भिषण अपघातात दुचाकीवरील दोघे युवक जागीच ठार झाले.  हा अपघात काल महामार्ग सहावर कारंजापासून दोन किलोमीटरवरील पांडे पेट्रोल पंपाजवळ रात्री ९ वाजताचे दरम्यान घडला. या अपघातात एम एच ३२ ए बी ७११३ क्रमांकाच्या दुचाकीवरील रोशन डोमा बारई वय ३० व प्रविण मनोहर मानापुरे वय २८ हे दोघेही कारंजातील युवकमित्र जागीच ठार झाले.सदर दुचाकीसुध्दा त्यांच्या मित्रांची होती. भरधाव वेगात असलेल्या एमएच ३२ वाय ३०३३ क्रमांकाच्या कारची धडक एवढी जोरदार होती की दुचाकीवरील एकजण कारच्या समोरील काचावर फेकल्या जाऊन आदळल्याने काचाचा चुराडा झाला. दुसरा युवक व दुचाकीला दुरवर फरफटत नेल्याने दुचाकीचे अक्षरशा तुकडे झाले व ठिकठिकाणी दुचाकीचे पार्ट रस्त्यावर पडत गेले. कारच्या समोरील भागाचे बरेच नुकसान झाले.कारचे सुध्दा समोरील पार्ट सर्वत्र विखरून पडले होते. अपघात इतका भिषण होता की भरधाव वेगात असलेल्या कारच्या चालक व शेजारील दोन्ही एअरबॅग खुल्या झाल्या. त्यामुळे कारचालक व शेजारी बसलेली व्यक्ती सुदैवाने सुखरूप बचावली. सदर कार महामार्ग पथकर नाक्यावरील अधिकारी रामाराव चालवत होता व त्याच कारमध्ये त्याचे शेजारी एक महीला बसली होती. ती महिला कोण? याची खमंग चर्चा अपघातानंतर परीसरात चर्चेचा विषय ठरली. तसेच कारचालक भरपूर मद्य प्यालेल्या अवस्थेत कार चालवत असल्याचे बोलले जात आहे. अपघात होताच कारचालक व ती महिला यांनी अपघातस्थळावर अपघातग्रस्तांना कोणतीही मदत न करता घाबरलेल्या अवस्थेत स्वताःचा जीव वाचवित घटनास्थळावरून पलायन केले व चार किलोमीटरवरील पथकर नाका गाठला. ती महिला मात्र निघून गेली. रामारावने पथकर नाका गाठून तेथील वाहनात बसून पत्नीमुलाबाळासह पलायन केले. त्याला पथकर नाक्यावरून पळून जाण्यास कोणाची मदत झाली? हा सुध्दा अपघातानंतर जोरदार चर्चेचा विषय सुरू होता. एकीकडे रामाराव महामार्ग पथक नाक्यावरील वाहनाने पसार झाला तर दुसरीकडे त्याच पथकर नाक्यावरील रूग्णवाहिका अपघातस्थळावर तातडीने पोहचून अपघाताचा बळी ठरलेल्या दोन्ही युवकांचे मृतदेह ग्रामिण रूग्णालयात घेऊन गेली.
 

 
 
इकडे अपघाताचे वृत्त कारंजा शहरात पसरताच अनेकांनी मिळेल त्या वाहनाने घटनास्थळ गाठले. अपघाताचे बळी ठरलेले दोघेही युवक कारंजा शहरातील असल्याचे कळताच तणावाचे वातावरण निर्माण झाले. कारचालक हा पथकर नाक्याचा अधिकारी असल्याचे कळताच काहींनी पथक नाक्याकडे धाव घेतली व कारचालकाचा शोध घेतला तेंव्हा कुटूंबासह फरार झाल्याचे कळताच तेथील व्यवस्थापकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न चालविला. ही घटना कळताच कारंजाचे ठाणेदार राजेंद्र शेटे यांनी घटनास्थळावर तसेच पथकर नाक्यावर पोलीस बंदोबस्त पाठवून वातावरण शांत करण्याचा पुर्णपणे प्रयत्न केला. घटना कळताच आमदार अमर काळे सुध्दा कारंजात पोहोचले व मृतांच्या घरी भेट दिली. त्याचवेळी पोलीस ठाण्याच्या परीसरातही मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कारचालक रामारावचा तातडीने शोध घेऊन त्याला अटक करण्याची मागणी नागरीक करू लागले.