जम्मू-काश्मीर : चकमकीत 3 दहशतवादी ठार, एक जवान शहीद

    दिनांक :16-May-2019
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील दलीपोरा परिसरात आज पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. मात्र, चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचा एक जवान देखील शहीद झाला आहे. याशिवाय अन्य दोन जवान जखमी झाल्याचंही समजतंय. दरम्यान, याठिकाणी शोधमोहिम अद्यापही सुरू आहे.
 
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दलीपोरा येथे काही दहशतवादी असल्याची माहिती एसओजीच्या संयुक्त पथकाला मिळाली होती. त्यानंतर आज पहाटे जवानांनी या परिसराला घेरले आणि शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीम सुरू असतानाचा दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले आणि चकमकीला सुरूवात झाली. दरम्यान, पुलवाम्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.