गुलाल उधळायला बारामतीला जाणार : चंद्रकांत पाटील

    दिनांक :16-May-2019
मुंबई: पश्चिम महाराष्ट्रातील 12 जागांवर युतीचे उमेदवार विजयी होणार असल्याने येत्या 23 मे रोजी बारामतीला जाऊन कांचन कुल यांच्या विजयी मिरवणुकीत गुलाल उधळणार असल्याचा दावा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केला.

 
 
लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 23 मे रोजी जाहीर होणार असला तरी त्यापूर्वीच विजयाचे दावे करण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वजनदार मंत्री आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील 12 च्या 12 जागांवर युतीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा केला आहे. एवढेच काय बारामती लोकसभा मतदार संघातून भाजपाच्या उमेदवार कांचन कुल या मोठ्या मतांच्या फरकाने विजयी होतील, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. येत्या 23 मे रोजी निकालाच्या दिवशी कांचन कुल यांच्या विजयी मिरवणुकीत गुलाल उधळायला आणि पेढे वाटायला आपण बारामतीला जाणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी ठासून सांगितले.
सुप्रिया सुळे या विजयाचा दावा करीत आहेत तर दुसर्‍याच्या सुखात सुख मानणारा मी असल्याने सुप्रिया विजयी झाल्या तर त्यांचे अभिनंदनही आपण करू, असेही ते यावेळी म्हणाले.