राहुल, प्रियांका यांनी इटलीला जाऊन मते मागावी
   दिनांक :16-May-2019
 
 
 नवी दिल्ली: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका वढेरा यांच्यावर जोरदार टीका केली. संकटकाळी इटलीला जाणार्‍या राहुल आणि प्रियांका यांनी लोकसभा निवडणुकीत इटलीला जाऊनच मते मागावी, अशी टीका योगींनी केली. सोनिया गांधी मूळच्या इटलीच्या असल्यामुळे योगी यांनी अशा पद्धतीने टीका केली.
 
 
 
देशावर संकट आले की राहुल गांधी इटलीला जाऊन बसतात. कॉंग्रेस अध्यक्ष आणि प्रियांका वढेरा यांना देशाचे काही घेणे-देणे नाही. त्यामुळे त्यांनी इटलीला निघून जायला हवे. तसेच तिथे मते मागायला हवीत, अशी टीका योगी यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठी योगी यांनी सभांचा धडाका लावला आहे. 19 मे रोजी सातव्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
यावेळी योगींनी राहुल यांच्यावर वैयक्तिक टीका केली. तसेच निवडणूक प्रचारात राहुल यांच्या मामांचा उल्लेख केला. ख्रिश्चियन मिशेल राहुलचे मामा नसून ‘शकूनी मामा’ आहेत. ऑगुस्ट वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदीत तेच दलाल होते, असा आरोपही योगी यांनी लावला. जे भगवान कृष्ण आणि रामाला मानत नाहीत त्यांना देशातील जनता मतदान करणार नाही, असेही योगी म्हणाले.
योगी यांनी यावेळी सपा प्रमुख अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांच्यावर देखील टीका केली. आपण राज्यात कायदा आणि सुव्यवस्था स्थापन केली, त्यामुळेच अखिलेश आणि मायावती एक व्यासपीठावरून सभांना संबोधित करीत असल्याचे योगी यांनी सांगितले.