लठ्ठपणा हा आजारच!

    दिनांक :17-May-2019
एकिकडे कुपोषण ही समस्या आहे तर दुसरीकडे लठ्ठपणा, वाढलेले अतिरिक्त वजन ही समस्या आहे. त्यातून अनेक व्याधी ग्रासतात आणि मग वैद्यकीय खर्च वाढतो. त्यामुळे आजकाल ‘वेट लॉस’ हा उद्योग झाला आहे. आता लठ्ठ कुणाला म्हणायचे? व्यक्तीचे वजन त्याच्या उंची आणि वयाच्या प्रमाणे अपेक्षित असणार्‍या वजनाच्या २० टक्क्याहून जास्त असते तेव्हा त्या व्यक्तीला लठ्ठ म्हणतात. आता जे लठ्ठ आहेत, ज्यांचे वजन कमी आहे किंवा मग जे संतुलित आहेत अशा तीनही गटांतील व्यक्तींना न्युट्रीशियन असिस्टंटची नितांत गरज आहे. 

 
 
 
लठ्ठपणामुळे हृदयरोग, मधुमेह, काही ठराविक प्रकारचे कॅन्सर असे काही प्राणघातक विकार होऊ शकतात. मुख्यतः पोटाभोवती मेद जमा झाल्याने हृदय विकार आणि चयापचय क्रियेचे विकार वाढतात. शास्त्रीय दृष्ट्या हे सिद्ध झाले आहे की, वजन कमी करून लठ्ठपणामुळे होणारे आजार टाळणे शक्य आहे. १० किलो वजन कमी करण्याने लठ्‌ठ्पणाने होणार्‍या अकाली मृत्यूचे प्रमाण २० ते ३० टक्क्याने कमी होते.
 
कृश व्यक्तीना विविध न्युट्रीयन्ट कमतरतेमुळे होणारे विकार होतात. कृशपणामुळे शरीरातील विविध महत्त्वाच्या अवयवांवर ताण येऊन प्राणघातक विकार होऊ शकतात. लठ्ठपणा हा खूप हा सहसा आढळणारा आजार आहे. आनुवांशिक, भावनिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कारणांचा या आजारावर पगडा आहे. व्यक्ती जेव्हा चलनावलनाच्या गरजे पेक्षा जास्त कॅलरीज खाण्यातून मिळवते तेव्हा ती लठ्ठपणाच्या आहारी जाते. त्यामुळे अनेक लोकांसाठी खूप खाणे आणि खूप व्यायाम करणे हे या समस्येचे उत्तर वाटू लागते; पण त्याहून अनेक जास्त कारणे या समस्येपाठी लपलेली आहेत.
 
आपल्या वाढत्या वया बरोबर आपला मेटाबोलिझम्‌ रेट कमी होऊ लागतो. त्यामुळे आपणास निरोगी वजन राखण्यासाठी कमी कॅलरीज लागतात. स्त्रियांमध्ये सहज वजन वाढण्याचा काळ जास्त असतो. स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्या नंतरमेटाबोलिक रेट आणखीन कमी होतो.
 
आनुवांशिकता : लठ्ठपणा आणि कृशपणा हा कुटुंबात सारखा असल्याचे आढळते. शास्त्रीय दृष्ट्या हे सिद्ध करण्यात आले आहे की दत्तक मुलांमध्ये त्यांच्या जन्मदात्या पालकांचेच लठ्ठपणा किंवा कृशपणा हे गुण आढळतात. आनुवांशिक प्रभाव महत्त्वाचा असला तरी काही प्रमाणात व्यक्तीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक सवयीसुद्धा लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरतात. जसे खाण्यापिण्याच्या सवयी, चलनवलन, झोपण्याचे तास, इ.
 
मानसिक कारणांमुळे सुध्दा लठ्ठपणा येऊ शकतो, कारण अनेक व्यक्ती दुखीः किंवा नको असलेले विचार टाळण्यासाठी खात राहतात. आजार हे कारण लोकांना वाटते तितके रोजचे नसले तरी काही आजार असे आहेत ज्यामुळे लठ्ठपणा येतो. हार्मोनचे विकार, मानसिक विकार आणि काही दुर्मिळ आजारात वजन वाढण्याकडे शरीराचा कल जातो. काही औषधांमुळे सुद्धा शरीराचा लठ्ठपणाकडे कल जातो.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी ध्येये ठेवणे गरजेचे आहे.
- निरोगी वजन गाठणे
- निरोगी वजन कायम टिकवणे.
याकडे लक्ष द्यायला हवे. त्यासाठी आहारावर नियंत्रण, संतुलित आहार, व्यायाम आणि दिनचर्येत नियमितता आवश्यक आहे.