सातार्‍याची प्रियांका ‘मकालू’वर पाय रोवणारी पहिली भारतीय महिला

    दिनांक :17-May-2019
जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर
 
सातारा: सातार्‍याची गिर्यारोहक प्रियांका मोहितेने मकालू शिखर सर करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. मकालू शिखर सर करणारी प्रियांका ही पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे. मकालूची उंची आठ हजार मीटरपेक्षा अधिक असून, ते जगातले पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. या महाराष्ट्र कन्येने 15 मे रोजी मकालू शिखर सर करत विक्रम घडवला.
 

 
 
प्रियांका मोहितेने याआधी माऊंट एव्हरेस्ट, किलिमांजरो आणि ल्होत्से ही जगातील उंच शिखरे सर केली आहेत. याच कामगिरीसाठी तिला महाराष्ट्र सरकारने प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवले आहे. प्रियांकाने चढाई केलेले हे आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीचे तिसरे शिखर ठरले आहे.
प्रियांकाने याआधी अनेक हिमालय-मोहिमा सहज पूर्ण केल्या आहेत. तिने अनेक उंच शिखरे पादाक्रांत केली आहेत. वयाच्या अवघ्या 21 वर्षी प्रियांकाने जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले होते. 2018 साली जगातील चौथ्या क्रमांकाचे ल्होत्से शिखरही तिने पादाक्रांत केले होते.
प्रियांकाने तिचे गिर्यारोहणातील शिक्षण नेहरू गिर्यारोहण संस्थेमधून घेतले आहे.
बंदरपूछ या शिखरापासून सुरुवात करीत तिचा गिर्यारोहणातील प्रवास सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना मी माझा आदर्श मानते आणि यशाची उंची गाठण्याचा प्रयत्न करते, असे ध्येयवेडी प्रियांका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाली. गिर्यारोहण हे क्षेत्र कायम पुरुषप्रधान मानले जाते. पण, मला हा समज मान्य नाही. म्हणूनच महिलाही मागे नसल्याचे सिद्ध करण्याचा मी प्रयत्न करते, असे प्रियांकाने उत्साहाने सांगितले.
बंगळुरूच्या एका जैवतंत्रज्ञान कंपनीत संशोधक म्हणून प्रियांका काम करते. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत नोकरी करीत उरलेल्या वेळात ती मोहिमा आणि पर्वत चढाईचा सराव करत असते. कधीही स्वत:ला कमकुवत समजू नका आणि जगातील कोणतीही गोष्ट साध्य करायला कठीण नसते, असा संदेश प्रियांकाने महिलांना दिला आहे.